मंत्रिमंडळ विस्तारात यादीतील नाव कापल्याच्या रागातून गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळअजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर आगपाखड करत आहेत. भुजबळ यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोडून येवला गाठले असून तिथे कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या काळात भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या राजकारणापासून ते राज्यसभेची जागा सुनेत्रा पवारांना देण्यापर्यंतचे सगळेच विषय बाहेर काढले आहेत. तसेच विधानसभेला लढायला लावून आता राज्यसभेवर जायला सांगत असल्याची टीका केली आहे. कसला दावा आणि कसला वादा, असेही वक्तव्य भुजबळ यांनी केल्याने राष्ट्रवादीत चांगलाच वाद रंगल्याचे चित्र आहे.
अशातच पुण्यात भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच वाद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ समर्थक ओबीसी कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन केले आहे. यावरून राष्ट्रवादीतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. जशास तसे उत्तर दिले जाईल नाही ते उद्योग करू नका नाहीतर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिला आहे.
अजित पवारांविरोधात जोडे मारो आंदोलन केल्याने राष्ट्रवादी नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते जशासतसे उत्तर देण्याची तयारी करत आहेत. नको ते उद्योग करू नका नाहीतर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे त्यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना सुनावले आहे.
जे असे करतील ते समता परिषदेचे नाही - भुजबळदरम्यान, जोडे मारो आंदोलनावर भुजबळांनीही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मागच्या दोन दिवसापासून सांगत आहे अजित पवार यांच्या पुतळ्याला जोडे मारू नका, अपशब्द वापरु नका. आपल्या भावना शांततेत व्यक्त करा. जे असे करतील ते समता परिषदेचे नाही, असे भुजबळ म्हणाले आहेत.