प्रशिक्षणाविनाच प्रमाणपत्र ?
By Admin | Updated: June 29, 2016 04:59 IST2016-06-29T04:59:58+5:302016-06-29T04:59:58+5:30
गृहरक्षक दलाच्या (होमगार्डस्) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत राज्यातील अर्धा डझन सुरक्षारक्षक प्रशिक्षण केंद्रे अटींचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले.

प्रशिक्षणाविनाच प्रमाणपत्र ?
डिप्पी वांकाणी,
मुंबई- गृहरक्षक दलाच्या (होमगार्डस्) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत राज्यातील अर्धा डझन सुरक्षारक्षक प्रशिक्षण केंद्रे अटींचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले. जूनच्या प्रारंभी ही तपासणी करण्यात आली. यात काही केंद्रांत आवश्यक प्रशिक्षण साधने आणि पात्र प्रशिक्षक नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तर चक्क वर्गखोल्याच नव्हत्या. यावरून ही केंद्रे पैसे घेऊन प्रशिक्षणाविनाच उमेदवारांना नोंदणीकृत सुरक्षारक्षक बनवीत असाव्यात, असा संशय बळावला आहे.
वकील तरुणी पल्लवी पुरकायस्थ हिचा खून करणारा सज्जाद मोघूल हादेखील तिच्या अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. त्यामुळे या मुद्याला महत्त्व आले आहे.
सुरक्षारक्षक बनू इच्छिणाऱ्याला प्रशिक्षण केंद्राकडून तो प्रशिक्षित सुरक्षारक्षक असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. राज्यात ३५० सुरक्षा प्रशिक्षण केंद्रे असून, गृहरक्षक दलाकडून त्यांना परवाना दिला जातो.
गृहरक्षक विभागाने परवान्यासाठी काही अटी घालून दिल्या असून, त्यानुसार केंद्रचालकांना त्यांच्याकडील प्रशिक्षक व त्यांचा अनुभव याची माहिती तसेच त्यांचे गेल्या तीन वर्षांतील आयकर विवरण सादर करणे बंधनकारक आहे. याशिवाय केंद्रचालकाला त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे शपथपत्र द्यावे लागते. प्रशिक्षण केंद्रातील साधने, वर्गखोल्या, प्रशिक्षण आणि सरावासाठी केंद्रात मैदान आहे किंवा नाही याबाबतचीही माहिती सादर करणे अनिवार्य आहे.
आम्ही अनेक संस्थांची तपासणी केली. तेव्हा काही ठिकाणी वर्गखोल्या आणि प्रशिक्षक नसल्याचे दिसून आले. उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी गरजेची असलेली दोरखंडासारखी मूलभूत साधनेही काही ठिकाणी उपलब्ध नव्हती. काही केंद्रांत उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी मैदानच नव्हते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या संस्था प्रशिक्षणाशिवाय सुरक्षारक्षकाचे प्रमाणपत्र जारी करीत असल्याचा संशय आहे. काही केंद्रे १,००० ते ५,००० रुपयांच्या बदल्यात प्रशिक्षित सुरक्षारक्षकाची प्रमाणपत्रे देत असल्याची माहिती आम्हाला आमच्या स्रोतांकडून प्राप्त झाली असून, आम्ही त्याची चौकशी करणार आहोत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
आम्ही काही मोजक्या परवान्यांचे नूतनीकरण केले असले तरी प्रशिक्षण केंद्रांसाठी उमेदवारांची पोलिसांकडून पडताळणी अनिवार्य करण्याबाबतही आम्ही विचार करीत आहोत, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
>प्रशिक्षणासाठी मूलभूत साधनेही नाहीत
आम्ही अनेक संस्थांची तपासणी केली. तेव्हा काही ठिकाणी वर्गखोल्या आणि प्रशिक्षक नसल्याचे दिसून आले. उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी गरजेची असलेली दोरखंडासारखी मूलभूत साधनेही काही ठिकाणी उपलब्ध नव्हती.
काही केंद्रांत उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी मैदानच नव्हते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.