रेडिमेड खाद्यपदार्थांना खवय्यांची मागणी
By Admin | Updated: July 4, 2016 03:23 IST2016-07-04T03:23:58+5:302016-07-04T03:23:58+5:30
मुस्लीम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यामध्ये रोजे सोडण्याकरिता विविध पदार्थांची रेलचेल वाढली आहे.

रेडिमेड खाद्यपदार्थांना खवय्यांची मागणी
दासगाव : मुस्लीम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यामध्ये रोजे सोडण्याकरिता विविध पदार्थांची रेलचेल वाढली आहे. पारंपरिक खाद्यपदार्थ आता काळाच्या ओघात मागे पडू लागले आणि रेडिमेडकडे अनेकांचा कल वाढला आहे. त्यात आता भर पडली आहे ती सोशल मीडियाची. रमजान सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर प्रत्येकाच्या मोबाइलवर विविध रेसिपी पहावयास मिळत आहेत आणि रोजे सोडण्यासाठीही याच पदार्थांना पसंती दिली जात आहे. यामुळे फळांबरोबर अनेक वस्तूंच्या किमती वाढत असून सध्या रमजानमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी पहावयास मिळत आहे.
रमजान महिन्यालाही शास्त्रीय दृष्टिकोन आहे. किमान एक महिना मानवाच्या पचनसंस्थेस आराम मिळावा ही त्यामागची भावना. प्रत्येक दिवशी उपवास धरण्यापूर्वी आणि सोडल्यानंतर शरीराला आवश्यक पोषक आहार घेतला जाणे अपेक्षित आहे. याकरिता काही पारंपरिक खाद्यपदार्थ आणि फळांचा समावेश आहारात केला जातो. मात्र काळाच्या ओघात या महिन्यात आता उलट क्रिया केली जात आहे.
मुस्लीम महिलांची रात्रभर तयारी सुरू असते. पहाटे विविध खाद्यपदार्थ रोजे धरणाऱ्याच्या समोर असतात. काळाच्या ओघात पारंपरिक पदार्थ मागे पडू लागले आणि हॉटेलमधील विविध तयार खाद्यपदार्थ खरेदी करण्याबरोबरच रेडिमेड पदार्थांकडे कल वाढलेला दिसून येतो. खीर, फालुदा, विविध आईस्क्रिम, विविध मसाले, खाद्यपदार्थ आता पॅकिंगमध्ये उपलब्ध झाले आहेत. यामुळे कमी वेळेत चटकदार पदार्थ खाण्याचा आनंद आता प्रत्येक जण घेत आहे. बाजारातील तयार समोसे, भजी, चिकन तंदुरी तसेच चिकनपासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक पदार्थांना जास्त प्रमाणात पसंती आहे.
या वस्तू पूर्वी घरामध्ये तयार करण्यात येत होत्या, मात्र सध्या बाजारात सहजपणे उपलब्ध होत असल्याने घरात बनवणे बंद झाले आहे. (वार्ताहर)
>पॅके टचे पदार्थ
खीर, फालुदा या वस्तू पूर्वी दुधापासून घरामध्येच तयार करण्यात यायच्या. याचा रमजान महिन्यात उपवास सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो मात्र सध्या या वस्तू बाजारामध्ये पॅकेटमध्ये उपलब्ध होत असल्याने घरी बनवण्यापेक्षा पॅकेटच्या वस्तूंना मोठे महत्त्व देण्यात येत आहे. यामुळे पाटा-वरवंटा घेवून विविध मसाले बनवण्याचे दिवस आता मागे पडू लागले आहेत.