मुंबईकरिता सीईओ नेमणार
By Admin | Updated: November 8, 2014 04:03 IST2014-11-08T04:03:08+5:302014-11-08T04:03:08+5:30
मुंबई शहराच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्याकरिता अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी नियुक्त करून मुंबईशी संबंधित सर्व एजन्सींच्या कारभारावर देखरेख करण्याचे अधिकार

मुंबईकरिता सीईओ नेमणार
मुंबई : मुंबई शहराच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्याकरिता अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी नियुक्त करून मुंबईशी संबंधित सर्व एजन्सींच्या कारभारावर देखरेख करण्याचे अधिकार त्यांना देण्यात येतील, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे खा. राहुल शेवाळे यांनी हा मुंबई स्वतंत्र करण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. एकेकाळी भाजपाच्या वर्तुळात ऊठबस असलेल्या सुधींद्र कुळकर्णी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरिता सीईओ असावा, अशी भूमिका मांडली होती. नेमकी त्याच भूमिकेची री फडणवीस यांनी ओढली.
सध्या महापालिका, एमएमआरडीए, म्हाडा, जिल्हाधिकारी अशा विविध एजन्सीज मुंबईच्या विकासाचे निर्णय घेतात. त्यांच्यामध्ये समन्वय नसल्याने ही जबाबदारी त्या अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असतील. हा अधिकारी राज्याच्या मुख्य सचिवांना बांधील असेल, असे फडणवीस यांचे मत आहे.
शिवसेनेचे खा. राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांची ही भूमिका म्हणजे मुंबई शहराचे व्यवस्थापन करण्यातील अपयशाची कबुली असल्याचे मत व्यक्त केले. हे मुंबई वेगळे करण्याचे कारस्थान असल्याचे ते म्हणाले.
सुधींद्र कुळकर्णी यांनी शिवसेनेचा विरोध अप्रस्तुत असून, आपली भूमिका ही शहर व्यवस्थापनासंबंधी मर्यादित होती. कुणीही मुंबई शहर स्वतंत्र करू शकत नाही, असे मत व्यक्त केले. मुंबईत वेगवेगळ्या एजन्सी नागरी सुविधा पुरवत असल्याने गोंधळात भर पडत असल्याने त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा मांडली असताना अचानक राहुल शेवाळे यांनी कशी घेतली, असा सवाल भाजपाकडून केला जात
आहे. (विशेष प्रतिनिधी)