झिका विषाणूसाठी केंद्रीय पथक झाईत, आश्रमशाळेसह आरोग्य केंद्राची पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 06:33 AM2022-07-16T06:33:20+5:302022-07-16T06:33:44+5:30

आश्रमशाळेतील सात वर्षीय विद्यार्थिनीला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर येताच केंद्रीय आरोग्य पथकाच्या पाच सदस्यीय टीमने पाहणी केली.

Central team inspects health center including ashram school in bordi for Zika virus | झिका विषाणूसाठी केंद्रीय पथक झाईत, आश्रमशाळेसह आरोग्य केंद्राची पाहणी 

झिका विषाणूसाठी केंद्रीय पथक झाईत, आश्रमशाळेसह आरोग्य केंद्राची पाहणी 

Next

बोर्डी : आश्रमशाळेतील सात वर्षीय विद्यार्थिनीला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर येताच केंद्रीय आरोग्य पथकाच्या पाच सदस्यीय टीमने झाई शासकीय प्राथमिक आश्रमशाळा, डहाणू उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. आश्रमशाळेला भेट देऊन तेथील निवास, भोजन, पाणी आदी व्यवस्थेचा आढावाही त्यांनी घेतला. या शाळेतील अन्य सात विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

केंद्रीय आरोग्य पथकाच्या डॉ. अरविंद अलोने, डॉ. ऐश्वर्या, डॉ. प्रीती प्रकाश, संजय तिवारी, महेंद्र सोनार या सदस्यांनी झाई आश्रमशाळेला भेट देऊन आढावा घेतला. तत्पूर्वी, झिका विषाणूबाधित विद्यार्थिनी उपचार घेत असलेल्या डहाणू उपजिल्हा रुग्णालयात जाऊनही माहिती घेतली. त्यानंतर विद्यार्थिनीची आरोग्य तपासणी केलेल्या लगतच्या गुजरात राज्यातील देहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डहाणूतील घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्राचीही त्यांनी पाहणी केली. झिका विषाणूबाबतच्या मोहिमेत हे पथक महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाला मार्गदर्शन करणार असल्याचे समजते. यावेळी पालघर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील आणि त्यांची टीम, तसेच डहाणू व तलासरी पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी अनुक्रमे डॉ. संदीप गाडेकर, डॉ. रितेश पटेल उपस्थित होते.

१९२ विद्यार्थ्यांना पाठविले घरी 

  • आश्रमशाळेतील १३ विद्यार्थी डहाणूतील आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. त्यामध्ये सात वर्षीय झिका विषाणूबाधित विद्यार्थिनी, तसेच  स्वाइन फ्लू झालेल्या सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 
  • घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन आश्रमशाळेच्या पाच किमी परिसरात विशेष सर्वेक्षण सुरू केले आहे, तर खबरदारी म्हणून या निवासी शाळेतील १९२ विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले आहे. 
  • पुढील दहा दिवस त्यांच्या प्रकृतीच्या निरीक्षणासाठी गावनिहाय यादीनुसार आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात टॅमीफ्लू गोळ्या उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

Web Title: Central team inspects health center including ashram school in bordi for Zika virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.