मध्य रेल्वेचा वेग मंदावला
By Admin | Updated: July 31, 2014 04:09 IST2014-07-31T04:09:32+5:302014-07-31T04:09:32+5:30
चार दिवसांपासून उसंत न घेतलेल्या पावसातही मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्री पडलेल्या प्रचंड पावसामुळे मात्र गाड्यांचा वेग मंदावला

मध्य रेल्वेचा वेग मंदावला
ठाणे : चार दिवसांपासून उसंत न घेतलेल्या पावसातही मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्री पडलेल्या प्रचंड पावसामुळे मात्र गाड्यांचा वेग मंदावला. मुख्य मार्गावरील भांडुप, घाटकोपरसह वांगणी, कर्जत, अंबरनाथ, कल्याण या सेक्शनमध्ये ट्रॅकमध्ये पाणी तुंबल्याने हा गोंधळ झाला होता. त्यामुळे मंगळवारी पहाटेपासून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत लोकल २० मिनिटे ते अर्धा तास विलंबाने धावत होत्या़ मात्र, ती अखंड सुरू असल्याने प्रवाशांत समाधानाचे वातावरण होते़
कर्जत मार्गावरील खोळंब्याचा फटका काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही बसल्याने पुण्याला जाणाऱ्या तसेच तेथून येणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना त्याचा काहीसा त्रास झाला. चाकरमान्यांनी मात्र पावसाचा आनंद लुटत रेल्वे सुरू आहे, यावरच आश्चर्य व्यक्त करून समाधान मानले. भांडुप-घाटकोपर भागातही बऱ्याच प्रमाणात झालेल्या पावसाने तेथील सखल भागातील ट्रॅकमध्ये (रुळांमध्ये) पावसाचे पाणी तुंबले होते. तसेच कर्जत पट्ट्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने काही काळ पाणी साचले होते. सकाळी साडेसातनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने हळूहळू पाण्याचा निचरा झाला आणि वाहतूक पूर्वपदावर आली.
त्यामुळे अप/डाऊन धीम्या-जलद दोन्ही दिशांवरील उपनगरीय लोकलसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा वेग मंदावला होता. सकाळपासूनच हा घोळ झाल्याने कल्याणसह ठाणे व घाटकोपर भागांत गाड्यांचे बंचिंग (कोंडी) झाली होती. त्यामुळे या ठिकाणी एकामागोमाग एक गाड्यांच्या रांगा दिसत होत्या.