मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर
By Admin | Updated: January 2, 2015 14:51 IST2015-01-02T14:23:02+5:302015-01-02T14:51:15+5:30
तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर प्रवाशांचा उद्रेक यामुळे ठप्प पडलेल्या मध्य रेल्वेची वाहतूक दुपारनंतर सुरु झाली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. २ - तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर प्रवाशांचा उद्रेक यामुळे ठप्प पडलेल्या मध्य रेल्वेची वाहतूक दुपारनंतर सुरु झाली आहे. कडेकोट पोलिस बंदोबस्तात दिव्याहून सीएसटीकडे लोकल रवाना झाली असून सध्या मध्य रेल्वेवरील वाहतूक विलंबाने सुरु आहे. संध्याकाळी उशीरापर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत होईल अशी शक्यता आहे.
वारंवार होणा-या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात दिवा स्थानकात रेल्वे प्रवाशांचा संतापाचा शुक्रवारी सकाळी उद्रेक झाला. संतप्त प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरुन रेल रोको केला. या सर्व गोंधळामुळे सुमारे कल्याण ते ठाणे या दरम्यान पाच ते सहा तास मध्य रेल्वे ठप्प पडली. दुपारी बाराच्या सुमारास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांनीही आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु केेले. मात्र दिव्याहून सीएसटीकडे लोकल ट्रेन सोडावी या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम होते. अखेर रेल्वे प्रशासनाने लोकल सोडण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलनकर्ते बाजूला झाले. यानंतर दुपारी साडे बाराच्या सुमारास दिव्याहून मुंबईकडे पहिली लोकल रवाना झाली.
दिव्यातील आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळताच ठाणे आणि कल्याण स्थानकात खोळंबलेल्या गाड्या त्यांच्या नियोजितस्थळी रवाना व्हायला सुरुवात झाली आहे.