लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी रविवारी मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)- इगतपुरी भागाची सविस्तर सुरक्षा तपासणी केली. त्यामुळे सुटीच्या दिवशी रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी कामावर हजर होते. मीना यांनी संयुक्त क्रू लॉबी आणि ‘वरुण’ प्रणालीच्या उद्घाटनाबरोबरच सिग्नल बिघाड आणि दुरुस्ती यावरील पुस्तिकेचे प्रकाशनही केले.
मीना यांच्या पाहणी दौऱ्याची सुरुवात इगतपुरी स्टेशनवरून झाली. त्यांनी इगतपुरी-कसारा विभागावरील तळ घाट रिव्हर्सल (टीजीआर) स्ट्रेच क्रमांक २ आणि ३ चीही पाहणी केली. तसेच प्रवासी वाहतुकीत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागाच्या रिमोट डायग्नोस्टिक आणि प्रेडिक्टिव मेंटेनन्स सिस्टमचीही तपासणी केली. त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.
मीना यांच्या पाहणी दौऱ्यामध्ये कल्याण आणि दादरदरम्यान फास्ट मार्गावर १२० किमी प्रतितास वेगाने हाय स्पीड रन करण्यात आली.
आढावा आणि सूचना
- कल्याण-कसारा आणि कल्याण-आसनगाव दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या कामाच्या स्थितीचा आढावा.
- आसनगाव स्थानकावर स्टेशन बुकिंग ऑफिस, नवीन आरपीएफ पोस्ट, रेल्वे कर्मचारी कॉलनी आणि गार्डनची सुरक्षा, प्रवाशांच्या सुविधांची पाहणी.
- कल्याण यार्ड पुनर्बांधणीचा आढावा आणि रेल्वे रुग्णालयाची पाहणी. प्रगत प्रशिक्षण केंद्रातील नूतनीकृत वर्गाचे उद्घाटन.