मध्य रेल्वे विस्कळीत, टिटवाळ्याजवळ झोपडपट्टीधारकांचा रेलरोको
By Admin | Updated: January 19, 2017 16:48 IST2017-01-19T16:19:51+5:302017-01-19T16:48:12+5:30
टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमणं हटवण्याची कारवाई सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात येत आहे.

मध्य रेल्वे विस्कळीत, टिटवाळ्याजवळ झोपडपट्टीधारकांचा रेलरोको
>ऑनलाइन लोकमत
टिटवाळा, दि. 19 - टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून करण्यात येणार होती. मात्र त्याआधीच या कारवाईला विरोध करत झोपडपट्टीधारकांनी रेल्वे रोको केला. टिटवाळ्याच्या इंदिरानगरमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार होती. याविरोधात जमावाने आक्रमक होत रेलरोको केला. यामुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. काही वेळानंतर झोपडपट्टीधारकांनी रेलरोको मागे घेतला, व कल्याणच्या दिशेने एक लोकल सोडण्यात आली. रेल्वे सेवा पूर्वपदावर आली असली तरी परिसरातील तणाव कायम आहे.
कारवाईसाठी गेलेल्या पथकाने तणावाची परिस्थिती लक्षात घेता प्रशासकीय अधिका-यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. कारवाईला विरोध दर्शवत झोपडपट्टीधारकांनी आपला मोर्चा रेल्वे रुळावर वळवून रेल रोको केला. यानंतर लोहमार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमाव मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा काहीही उपयोग झाला नाही. घटनेनंतर जवळपास एक तास मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होते.