पुणे : दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्रांच्या जंजाळातून सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) तिकिटातील सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, ही सवलत देताना तीव्र अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींच्या सहायकाला सवलत मिळविण्यासाठी एसटीचा दाखला बंधनकारक केला आहे. त्यामुळे काही दिव्यांगांना गरज नसताना पुन्हा एसटीकडे दाखल्यासाठी खेटे मारावे लागतील. दिव्यांगांना स्थानिक बससेवा, राज्य मार्ग परिवहन विभाग आणि रेल्वेच्या प्रवासात तिकिटाल सवलत दिली जाते. मात्र, प्रत्येक सवलत मिळविण्यासाठी दिव्यांगांना वेगवेगळी ओळखपत्रे मिळवावी लागतात. रेल्वे, स्थानिक बससेवा आणि एसटी अशी तीन ओळखपत्रे बाळगावी लागतात. केंद्र सरकारने देशातील दिव्यांगांसाठी विशेष युडीआयडी ओळखपत्र जाहीर केले आहे. त्यासाठी सर्व कागदपत्रांची तपासणी, दिव्यंगत्वाचे प्रमाण याची खात्री केली जाते. मग, एकच ओळखपत्र राज्य आणि देशातील सेवांसाठी लागू करण्याची मागणी दिव्यांगांकडून करण्यात आली होती. एसटीच्या निम आरामसह इतर बससेवेमधे दिव्यांगांना प्रवास शुल्कामधे ७५ टक्के आणि त्याच्या मदतनीसास ५० टक्के सवलत देण्यात येते.
दिव्यांग व्यक्तींना प्रवासात युडीआयडी कार्डवर देखील सवलत देण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. मात्र, यापुर्वी दिलेले पास देखील सुरुच आहेत. एसटीच्या वाहतूक व्यवस्थापकांनी देखील तसाच निर्णय घेतला आहे. मात्र, नव्या आदेशाचा स्थानिक पातळीवर चुकीचा अर्थ काढून दिव्यांगांना सवलत नाकारली जाऊ नये. हरिदास शिंदे, दिव्यांग चळवळीतील कार्यकर्ते--------------------