केंद्र, राज्य सरकार असंवेदनशील
By Admin | Updated: May 5, 2015 02:11 IST2015-05-05T02:11:04+5:302015-05-05T02:11:04+5:30
दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकरी संकटात सापडला आहे. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी फायदेशीर ठरू शकते.

केंद्र, राज्य सरकार असंवेदनशील
औरंगाबाद : दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकरी संकटात सापडला आहे. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी फायदेशीर ठरू शकते. सरकारने वास्तवतेचे भान ठेवून कर्जमाफी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी पत्र परिषदेत केली. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला़
पवार म्हणाले, की यापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात जास्त होत होत्या. या वेळेला मराठवाड्यात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. याच्या खोलात जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नैराश्य दिसत आहे. दुष्काळ किंवा गारपिटीमुळे नुकसान झाले, तर त्याला तत्परतेने मदत करण्याची खबरदारी घ्यायला पाहिजे; पण सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार त्यात कमी पडत असल्याचे पवार म्हणाले़
राज्यातील मागास भागांच्या अभ्यासासाठी नेमलेल्या केळकर समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. विशेषत: पाण्याचा असमतोल कमी करण्यासाठी ज्या शिफारशी केल्या त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली़ विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा असेल तर आम्ही त्यांच्या बाजूने आहोत; पण आतापर्यंत जनतेकडून तसे दिसत नाही. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये तेथील जनतेने तसा कौल दिलेला नाही. त्यामुळे मला वेगळ्या विदर्भाचे मत हे तेथील जनतेचे असेल असे वाटत नाही. ते चार नेत्यांचे असेल.
एमआयएमचे यश तात्पुरते
औरंगाबाद महापालिकेत एमआयएमने मिळविलेल्या यशाविषयी पवार म्हणाले, एमआयएमकडे काही लोक खेचले गेले हे खरे आहे; पण ही कायमची फेज नाही. केवळ अशा गोष्टी वर्ष दोन वर्षे होतात.
उसाला तीन हजार भाव हवा
सरकार बदलल्यानंतर वर्षभरात शेतकऱ्यांची काय दैना केली हे सर्व जण बघतायत. म्हणून वेडीवाकडी भाषणे करायची आणि स्वत:वर जबाबदारी आली तेव्हा ती दुसऱ्यावर ढकलायची हे बरोबर नाही, असा टोला पवार यांनी खा. राजू शेट्टी यांना लगावला. उसाला २७०० ते ३००० रुपये भाव मिळाला पाहिजे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)