अडचणीतील कारखान्यांना केंद्राने अनुदान द्यावे : पवार

By Admin | Updated: November 23, 2014 23:46 IST2014-11-23T21:41:37+5:302014-11-23T23:46:52+5:30

कृष्णेचा गळीत हंगाम शुभारंभ : शेतकरी संघटनांना फटकारले

Center should give subsidy to the distressed factories: Pawar | अडचणीतील कारखान्यांना केंद्राने अनुदान द्यावे : पवार

अडचणीतील कारखान्यांना केंद्राने अनुदान द्यावे : पवार

रेठरे बुद्रुक : साखरेसह इथेनॉलसारख्या इतर उत्पादनांना चांगल्या प्रतीचा भाव मिळाला, तरच उसाला योग्य दर मिळू शकतो़ गत सहा महिन्यांत मालाची निर्यात कमी व आयात जादा झाली आहे़ मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचा भाव कमी झाल्यामुळे अडचणीत असणाऱ्या कारखानदारीला बळ देणे गरजेचे आहे़ शेतकऱ्यांना वाढीव ऊसदर देण्यासाठी केंद्र शासनाने अनुदान म्हणून मदत करावी,’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले़
रेठरे बुद्रुक, ता़ कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा ५५ वा गळीत हंगाम शुभारंभ व कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या हस्ते उत्साहात झाला़ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते होते़
कार्यक्रमास क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, राजाराम बापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, अ‍ॅड़ बाळासाहेब शेरेकर, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अमित कदम, रयत शिक्षण संस्थेचे संचालक जे़ के़ जाधव, शहाजी पाटील, प्रशांत यादव, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ हिंमत पाटील, कार्यकारी संचालक अशोक नलवडे, कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश पाटील आदींसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती़
अजित पवार म्हणाले, ‘शरद पवार कृषिमंत्री होते, तेव्हा शेतकरी व सहकार चळवळीत काम करणाऱ्यांना आत्मविश्वास होता़ त्यांच्याशी बातचित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघायचा़ तरीदेखील आम्ही शेतकऱ्यांचे आहोत, असे म्हणत काही संघटना उठसूट बारामतीला येऊन आंदोलने करायचे़ आम्ही त्यांना सांगायचो की, मुख्यमंत्री कऱ्हाडचे आहेत़ कऱ्हाडात जाऊन आंदोलन करा; परंतु नाही कृषिमंत्र्यांच्या दारातच आंदोलने करायची़ जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकारण करणाऱ्यांना सांगतो आता कृृषिमंत्री बिहारचे आहेत़ बिहारला जाऊन आंदोलने करणार का?’
आम्ही देखील शेतकऱ्यांचेच आहोत़ आम्हाला ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे़ सत्ता कालावधीत आमच्याकडून काही चुका झाल्या असतील; परंतु काम करणाऱ्यांच्याकडूनच चुका होतात़ काम न करणाऱ्यांच्याकडून चुका कशा होतील़ उसाचा दर वाढवून मिळावा म्हणून आमची सत्ता होती, तेव्हा कारखाने सुरू होण्यापूर्वीच संघटना आंदोलने करत होती़ आता हेच शेतकऱ्यांची बाजू घेणारे लोक ‘वेळ पडली तर आम्ही आंदोलने करू, चर्चा सुरू आहे, अशी भाषा करीत आहेत़ सरकार बदललं, सरकारमधील माणसं बदलली की स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून संघटनांमधील माणसं बदलली असल्याची खरमरीत टीका शेतकरी संघटनेला उद्देशून केली़
अविनाश मोहिते म्हणाले, ‘कार्यक्षेत्रातील ऊस लवकरात लवकर गाळप करणार आहे़ दोन वर्षांपासून गेटकेनचा ऊस पूर्णपणे बंद केला आहे़ त्यामुळे तोडणी, वाहतूक खर्च कमी झाला आहे, आणि ऊसदराबाबत पहिल्या दहा कारखान्यांमध्ये आपल्या कृष्णा कारखान्याचा नंबर आहे़ तसेच कारखान्याशी संबंधित कृषी महाविद्यालयामध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये फक्त सभासदांच्याच मुलांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जात आहे़ सुरेश पाटील यांनी आभार मानले़ (वार्ताहर)

अजून शंभर दिवस बघू...
राज्यात भाजप शासनाला दिलेल्या पाठिंब्याबाबत अजित पवार म्हणाले, ‘आज महाराष्ट्रात त्रिशंकू परिस्थिती आहे़ सारख्या-सारख्या निवडणुका आपल्याला परवडणाऱ्या नाहीत़ बहुमताचा कौल भाजपचा आहे़ त्यामुळे आम्हाला त्यांनी पाठिंबा मागितला नव्हता, तरी आम्ही तो दिला आहे़ राज्याच्या भल्याचे असेल त्याला आमचा पाठिंबा. चांगले असेल त्या चांगल्यांच्या आम्ही पाठीशी उभे राहू़ सरकार स्थापन होऊन एकच महिना झाला आहे़ लगेच त्यांना विरोध करणं योग्य नाही़ अजून पुढील शंभर दिवस बघू. बैठका, मीटिंगा होतायत़, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अधिवेशनात भूमिका घेणार आहे़


यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ५५ व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी अजित पवार, अविनाश मोहिते व इतर.

Web Title: Center should give subsidy to the distressed factories: Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.