रस्ते, पुलांसाठी केंद्राचे ३४४ कोटी
By Admin | Updated: December 5, 2014 00:44 IST2014-12-05T00:44:59+5:302014-12-05T00:44:59+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील रस्ते आणि पूल निर्मितीसाठी केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) ३४४ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. मात्र त्यात विदर्भावर अन्याय

रस्ते, पुलांसाठी केंद्राचे ३४४ कोटी
विदर्भाला केवळ ९२ कोटी : बहुतांश निधी मराठवाडा-खान्देशात
यवतमाळ : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील रस्ते आणि पूल निर्मितीसाठी केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) ३४४ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. मात्र त्यात विदर्भावर अन्याय झाल्याचा सूर ऐकू येतो आहे.
वैदर्भीय भाजपा नेते नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी महाराष्ट्राला झुकते माप देत गेल्या काही वर्षांपासूनचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्याअंतर्गत रस्ते, पूल व रेल्वे ओव्हर ब्रिजचा समावेश असलेल्या २७ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते निधी अर्थात सीआरएफमधून ३४४ कोटी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले. गडकरी विदर्भाचे असल्याने अधिकाधिक निधी विदर्भाला मिळावा ही रास्त अपेक्षा वैदर्भीय बांधकाम अभियंते व कंत्राटदारांची होती.
मात्र प्रत्यक्षात विदर्भाच्या वाट्याला केवळ ९२ कोटी ४४ लाख रुपये प्राप्त झाले असून बहुतांश निधी हा मराठवाडा, खान्देशात देण्यात आला आहे. त्यातही जालना, धुळे, नंदूरबार या तीनच जिल्ह्यात सर्वाधिक निधी दिला गेला आहे.
विदर्भात गडचिरोलीला १३ कोटी १५ लाख रुपये मिळाले आहे. त्यातून सात किलोमीटरचा रस्ता आणि राज्य मार्ग क्र. ३७० वर मोठा पूल बांधला जाणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. २५७ वरील धावंडा नदीवर दिग्रस-पुसद मार्गावर सात कोटी ७५ लाख रुपये खर्च करून मोठा पूल बांधला जाणार आहे. अकोला जिल्ह्याला १५ कोटी ६० लाख रुपये मिळाले आहेत. त्यात बाळापूर शहरात मोठा पूल तर अकोला-म्हैसांग-लाखपुरी हा १३ किलोमीटरचा रस्ता व मोठा पूल बांधला जाणार आहे. वर्धा जिल्ह्याला रेल्वे उड्डाण पुलासाठी ४५ कोटी रुपये मिळाले आहेत.
आर्वी-वर्धा-वायगाव-राळेगाव मार्गाला जोडणारा रेल्वे पूल निर्माण केला जाईल. राज्य मार्ग क्र. २६७ वर हा ४५ कोटींचा निधी खर्च होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे सुमठाणा-तेलवासा-जुनाडा रोडवर आठ कोटी नऊ लाख रुपये खर्च करून पूल बांधला जाणार आहे. त्याच प्रमाणे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील राज्य मार्ग क्र. ३३५ वर मनसर-रामटेक-तुमसर रोडवर हा पूल निर्माण केला जाणार आहे. याशिवाय जालना जिल्ह्यातील भोकरदनला ९० कोटी, जळगावला २१ कोटी, धुळ्याला ७७ कोटी रुपये सीआरएफमधून दिले जाणार आहे.
अन्य काही भागांनाही काही प्रमाणात निधी दिला गेला आहे. मात्र निधी वाटपात वैदर्भीय मंत्री असूनही काँग्रेस सरकारप्रमाणेच भाजपा सरकारनेही विदर्भावर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)