केंद्र अधिकाऱ्यांच्या चुकीने फुटला पेपर!
By Admin | Updated: May 15, 2015 01:32 IST2015-05-15T01:32:33+5:302015-05-15T01:32:33+5:30
बीएससी द्वितीय वर्षाच्या ‘मॅथेमॅटिक्स’ या विषयाचा १५ मे रोजी होणारा पेपर केंद्र संचालकाच्या चुकीने फुटल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी

केंद्र अधिकाऱ्यांच्या चुकीने फुटला पेपर!
अकोला : बीएससी द्वितीय वर्षाच्या ‘मॅथेमॅटिक्स’ या विषयाचा १५ मे रोजी होणारा पेपर केंद्र संचालकाच्या चुकीने फुटल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आला. हा पेपर रद्द केला असून, हा पेपर २५ मे रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, हा पेपर कोणत्या केंद्रावर फुटला याबाबत विद्यापीठ प्रशासनाने गोपनीयता पाळल्याने या प्रकरणाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे बीएससी द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्राची परीक्षा २ मेपासून सुरू झाली. परीक्षा सुरळीत सुरू असतानाच विद्यापीठाचा भोंगळ कारभार १३ मे रोजी उघडकीस आला. बुधवारी बीएससी भाग-२च्या चौथ्या सत्राचा ‘मॅथेमॅटिक्स पेपर-७’ या विषयाचा पेपर होता; परंतु, एका परीक्षा केंद्रावरील केंद्राधिकाऱ्यांच्या चुकीने या पेपरऐवजी शुक्रवार, १५ मे रोजी होणारा ‘मॅथेमॅटिक्स पेपर-८’ या विषयाचा पेपर फोडण्यात आला. संबंधित परीक्षा केंद्रावर सायंकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर तत्काळ अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कळविण्यात आले. एकाच नावाचे दोन विषय असल्याने हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने शुक्रवारचा पेपर २५ मे रोजी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या प्रकारची सूचना महाविद्यालयांना देण्यात आली. (प्रतिनिधी)