केंद्र सरकारने बदलली घटनेतील उद्देशिका - वाघमारे

By Admin | Updated: November 28, 2015 01:59 IST2015-11-28T01:59:44+5:302015-11-28T01:59:44+5:30

संविधान दिनानिमित्त केंद्र सरकारने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींमध्ये राज्यघटनेतील मूळ उद्देशिकेतील काही शब्द बदलून घटनेचा अवमान केला

Center has changed the objectives - Waghmare | केंद्र सरकारने बदलली घटनेतील उद्देशिका - वाघमारे

केंद्र सरकारने बदलली घटनेतील उद्देशिका - वाघमारे

मुंबई : संविधान दिनानिमित्त केंद्र सरकारने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींमध्ये राज्यघटनेतील मूळ उद्देशिकेतील काही शब्द बदलून घटनेचा अवमान केला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केला आहे. यासंदर्भात शनिवारी केंद्र सरकारविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले.
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. वाघमारे म्हणाले, केंद्र सरकारने २६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये मराठी भाषेतील उद्देशिका प्रकाशित करण्यात आली आहे. परंतु, ही उद्देशिका घटनेच्या मूळ मराठी अनुवादातील उद्देशिकेप्रमाणे नसून, त्यामध्ये तब्बल २२ बदल करण्यात आले आहेत. ‘सार्वभौम’ शब्दाऐवजी ‘प्रभुत्व-संपन्न’, ‘धर्मनिरपेक्ष’ऐवजी ‘पंथनिरपेक्ष’, ‘लोकशाही’ऐवजी ‘लोकतंत्रात्मक’, ‘राजनैतिक’ऐवजी ‘राजकीय’, ‘धर्म’ऐवजी ‘श्रद्धा’ आणि ‘एकात्मता’ऐवजी ‘अखंडता’ असे शब्द वापरून मूळ गाभाच बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे उद्देशिकेचा अर्थ बदलला असून, अनेक महत्त्वाचे शब्द वगळून घटनेने नागरिकांना दिलेल्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्नही या जाहिरातील उद्देशिकेत करण्यात आल्याचे डॉ. राजू वाघमारे म्हणाले. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून देशाला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता संविधान दिनी छापलेली ही उद्देशिका म्हणजे भाजपा व संघाच्या विधानांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. एकीकडे घटना देशाचा आत्मसन्मान असल्याचे पंतप्रधान सांगतात आणि दुसरीकडे त्यांचेच सरकार उद्देशिकेत परस्पर बदल करते, ही बाब त्यांच्या उक्ती व कृतीतील विसंगती दर्शविणारी आहे. घटनेतील एकही शब्द घटना दुरुस्तीशिवाय बदलता येत नाही. यासंदर्भात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Center has changed the objectives - Waghmare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.