केंद्रातील सरकार केवळ उद्योगपतींचे
By Admin | Updated: October 11, 2014 06:20 IST2014-10-11T06:20:13+5:302014-10-11T06:20:13+5:30
केंद्रातील मोदी यांचे सरकार हे केवळ श्रीमंत व उद्योगपतींचे हित जपत असून, महाराष्ट्रातील जनतेने गरिबांच्या हिताचा विचार करणारेच सरकार सत्तेवर आणावे,

केंद्रातील सरकार केवळ उद्योगपतींचे
नाशिक/पुणे : केंद्रातील मोदी यांचे सरकार हे केवळ श्रीमंत व उद्योगपतींचे हित जपत असून, महाराष्ट्रातील जनतेने गरिबांच्या हिताचा विचार करणारेच सरकार सत्तेवर आणावे, असे आवाहन कॉँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.
वणी (ता. दिंडोरी) व सासवड (पुणे) येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर घाणाघाती टीका केली. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले, खोटी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदींनी लोकांची फसवणूक केली आहे. काँग्रेसच्या काळात आधार योजनेद्वारे ‘मनरेगा’ आणि अन्य योजनांतून अनुदानाच्या स्वरूपात थेट नागरिकांच्या खात्यात निधी वर्ग केला जात होता. आता मोदी सरकारच्या काळात जनतेचा पैसा थेट उद्योगपतींच्याच खात्यात जमा होत आहे. राज्यात दुष्काळ पडलेला असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. आता निर्यातबंदीमुळे भाव कोसळल्याने कांदा उत्पादकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस सरकारने ६ लाख लोकांना मोफत औषधे व आरोग्यसुविधा पुरविल्या. अमेरिकन उद्योगपतींच्या सांगण्यावरून १०८ औषधांच्या किमतींमध्ये वाढ करण्यास पंतप्रधानांनी मान्यता दिली आहे. मोदी सरकारच्या काळात कर्करोग आणि मधुमेहाची हजाराच्या घरातील औषधे लाखांत गेली आहेत. चीनच्या राष्ट्रपतींसोबत हिंदुस्थानात लडाखमध्ये चिनी सैन्यही घुसले. पाकिस्तानकडून भारतीय सैन्यावर गोळीबार सुरूच आहे. (प्रतिनिधी)