मोबाईलमुळे लाळग्रंथीचा कॅन्सर
By Admin | Updated: November 9, 2014 00:51 IST2014-11-09T00:51:11+5:302014-11-09T00:51:11+5:30
मोबाईल फोन ही आता चैनीची वस्तू नसून एक गरज झाली आहे. झोपेतून उठण्यासाठी गजर लावण्यापासून त्याचा उपयोग वाढला आहे. परंतु मोबाईल फोनच्या अतिवापराने मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो, असे मत जागतिक

मोबाईलमुळे लाळग्रंथीचा कॅन्सर
मेंदूपेक्षा या कॅन्सरचा धोका अधिक : नागपूरच्या डॉक्टरचे संशोधन
सुमेध वाघमारे - नागपूर
मोबाईल फोन ही आता चैनीची वस्तू नसून एक गरज झाली आहे. झोपेतून उठण्यासाठी गजर लावण्यापासून त्याचा उपयोग वाढला आहे. परंतु मोबाईल फोनच्या अतिवापराने मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने अभ्यासातून व्यक्त केले असले तरी याचा सर्वाधिक प्रभाव लाळग्रंथीवर (पॅरोटिड ग्लॅन्ड) पडतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. नागपुरातील एका महिला डॉक्टरने केलेल्या या संशोधनात लाळ ग्रंथीत चार महत्त्वाचे बदल घडून येत असल्याचे दिसून आले आहे. हे बदल कॅन्सरला कारणीभूत ठरणारे आहे.
विद्या शिक्षण प्रसारक मंडळ डेंटल कॉलेज अॅण्ड रिसर्च सेंटरच्या मुखरोग निदान व क्ष-किरण विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. स्तुती भार्गव यांचे हे संशोधन अहे.
मोबाईल रेडिएशनचा (किरणोत्सर्ग) मानवी आरोग्यावर किती वाईट परिणाम होऊ शकतो याची शक्यता आतापर्यंत अनेक संस्था आणि तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत. त्यात मोबाईलच्या अतिवापराचा सर्वाधिक परिणाम मेंदू व कानाच्या पोकळ नळीवर (आॅडिटरी ट्यूब) होत असल्याची सर्वाधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. परंतु या दोन अवयवांपेक्षा लाळग्रंथी थेट किरणोत्सर्गाच्या संपर्कात येत असल्याने त्याचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असल्याचे डॉ. भार्गव यांच्या संशोधनातून समोर आले आहे. त्यांनी मागील तीन वर्षांत यावर तीन टप्प्यात संशोधन केले. यात ३०० विविध विषय हाताळले असता, ही धक्कादायक बाब उजेडात आली. डॉ. भार्गव यांच्या मते, आपण मोबाईलवर संवाद साधताना तो कानाकडे कमी आणि गालाकडे जास्त असतो. मोबाईलचे रेडिएशन मेंदू आणि कानाच्या पोकळ नळीवर पडत असले तरी ते कवटीच्या आतमध्ये असते. यामुळे ते काही प्रमाणात सुरक्षित असतात. याच्या उलट लाळेच्या ग्रंथीवर फक्त त्वचा असते. त्यातल्या त्यात ही ग्रंथी कानाच्या समोर आणि खाली असते. यामुळे ती थेट रेडिएशनच्या संपर्कात येते. या तत्त्वाच्या आधारावर ज्या व्यक्ती सर्वात जास्त मोबाईलवर बोलतात त्यांच्यावर हे संशोधन केले. यात जी व्यक्ती मोबाईलचा अतिवापर करते तिच्या लाळग्रंथीमध्ये चार मोठे बदल आढळून आले. यात पहिला म्हणजे, ग्रंथीचा आकार वाढल्याचे दिसून आले. दुसरे, लाळ निघण्याच्या प्रमाणात वाढ झाली, तिसरे, संबंधित अवयवांमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि चौथे म्हणजे, थुंकीमधील प्रोटिनचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. थुंकीच्या गं्रथीतील हे बदल कॅन्सरला कारणीभूत ठरणारे आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत मोबाईलचा वापर तरुणांमध्ये अधिक होतो. यामुळे याचे दुष्परिणाम तरुणांमध्ये अधिक दिसण्याची शक्यता आहे.
संशोधनात मोबाईलचा अतिवापर करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या समस्याही दिसून आल्या. ज्यात गालाची त्वचा गरम होणे, कानाचा परिसर बधिर होणे, या शिवाय ज्यांना मायग्रेनचा त्रास होता त्यांच्यात या आजाराचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे.
डॉ. भार्गव यांच्या या संशोधनाच्या पहिल्या भागाला ‘नॅशनल सिम्पोसिएम’चा उत्कृष्ट शोध पेपरचा पुरस्कार मिळाला तर संशोधन पूर्ण झाल्यावर ‘एशिया पॅसिफिक डेंटल काँग्रेस’, दुबई यांचा पुरस्कार मिळाला. यासाठी ‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आॅफ हेल्थ सायन्स’ने अनुदान दिले होते. या संशोधनात डॉ. भार्गव यांना डॉ. मुक्ता मोटवानी, डॉ. विनोद पाटणी, अधिष्ठाता डॉ. उषा रडके, उपअधिष्ठाता डॉ. रामकृष्ण शिनॉय यांचे मार्गदर्शन मिळाले तर डॉ. अमित एस व डॉ. अर्पिता एस यांचे सहकार्य मिळाले आहे.
संशोधनाचे महत्त्व
मोबाईलच्या किरणोत्सर्गाचा आतापर्यंत मेंदू, हृदय व दुसऱ्या अवयवांवर काय परिणाम पडतो, यावर अनेक संशोधने झाली आहेत. त्याची माहितीही प्रसिद्ध झाली आहे. या तुलनेत लाळग्रंथीवर होणारा सर्वाधिक परिणाम आणि कॅन्सरची शक्यता यावर संशोधन झालेले नव्हते. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात डॉ. भार्गव यांचे संशोधन महत्त्वाचे मानले जात आहे.
लाळग्रंथीतत होतात चार बदल
मोबाईल गालाजवळ राहात असल्याने लाळ ग्रंथीवर किरणोत्सर्गाचा सर्वात जास्त परिणाम पडतो. यामुळे या ग्रंथीत चार बदल होतात. यात ग्रंथीचा आकार वाढतो, लाळ निघण्याचे प्रमाण वाढते, अवयवांमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि थुंकीमधील प्रोटिनचे प्रमाण वाढते. हे बदल कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात.