सेलिब्रेशन फॉर सी.एम.

By Admin | Updated: October 31, 2014 00:53 IST2014-10-31T00:53:27+5:302014-10-31T00:53:27+5:30

केवळ नागपुरातच नाही तर विदर्भाच्या इतिहासातील संस्मरणीय आणि आनंदाचा क्षण काही तासांवर येऊन ठेपला आहे. नागपूरकरांचे लाडके लोकप्रतिनिधी देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर

Celebration for C.M. | सेलिब्रेशन फॉर सी.एम.

सेलिब्रेशन फॉर सी.एम.

चौकाचौकात स्क्रीनवर शपथविधी लाईव्ह : फटाके फोडून, मिठाई वाटून साजरा होणारा आनंदोत्सव
नागपूर : केवळ नागपुरातच नाही तर विदर्भाच्या इतिहासातील संस्मरणीय आणि आनंदाचा क्षण काही तासांवर येऊन ठेपला आहे. नागपूरकरांचे लाडके लोकप्रतिनिधी देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तेव्हा नागपूरच्या इतिहासात हा क्षण सोनेरी अक्षरात लिहिला जाईल. आपल्या नागपूरचा एक सुशिक्षित, सुसंस्कृत तरुण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत आहे या सुखद अनुभूतीने सारे नागपूरकर तीन दिवसांपासून हरखून गेले आहेत. प्रत्येक जण जाती, धर्म आणि राजकीय अभिनिवेशाच्या भिंती ओलांडून हा आनंदाचा क्षण आपापल्यापरीने साजरा करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी नागपुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मुंबईसाठी रवाना झाले आहेत. भाजप नेते, कार्यकर्त्यांचाही यात समावेश आहे. फडणवीस यांच्यावर प्रेम करणाऱ्या सामान्य माणसांचाही यात समावेश आहे. परंतु आपण या शपथविधीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याची खंत असलेले नागरिकही मोठ्या प्रमाणावर आहेत. मुंबईला जाऊ शकत नसल्याचे दु:ख विसरून उद्याचा हा समारंभ आपापल्या घरी टीव्हीसमोर बसून ते पाहणार आहेत. नागपुरातील विविध भागातील तरुणांनी एकत्र येऊन हे सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीने करायचे ठरविले आहे. चौक, बाजार, वर्दळीच्या ठिकाणी मोठमोठे स्क्रीन लावून, पेढे वाटून, फटाके फोडत फडणवीसांच्या मुख्यमंत्री होण्याचा आनंदोत्सव ते साजरा करणार आहेत. त्यासाठी गुरुवारी दुपारपासूनच जय्यत तयारी सुरू झाली आहे.
रेल्वे हाऊसफुल्ल
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळेल त्या रेल्वेगाडीने मुंबईकडे धाव घेतली. विदर्भ एक्स्प्रेसमध्ये तर ७०० च्या वर कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झाले. त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे रेल्वेस्थानकाचा परिसर दणाणून गेला होता. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी उत्सुक होते. यात नागपुरातून दुपारी १.३० वाजता सुटणाऱ्या शालीमार-एलटीटी एक्स्प्रेसमध्ये भाजपच्या वतीने दोन स्लिपरक्लास बोगी बुक करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसनेही जवळपास ५०० कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. सायंकाळी ५ वाजता विदर्भ एक्स्प्रेसने जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी तर रेल्वेस्थानकार एकच जल्लोष केला. ‘देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी रेल्वेस्थानकावर जल्लोष केला. विदर्भ एक्स्प्रेसने प्रभाग क्रमांक ३० चे नगरसेवक रमेश पुणेकर आपल्या १० कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झाले. टीव्हीवर शपथविधी पाहण्यापेक्षा स्वत: उपस्थित राहण्याचा आनंद वेगळा असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचे नागपूरचे संघटनमंत्री अनंत पात्रीकर हे सुद्धा असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झाले. सुशासन देणारा मुख्यमंत्री असल्यामुळे शपथविधीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा आनंद औरच असल्याचे त्यांनी सांगितले. साकोलीचे सरपंच किशोर पोगळे हे सुद्धा ६० कार्यकर्त्यांसह विदर्भ एक्स्प्रेसने रवाना झाले. गोंदियाचे महामंत्री सुंदर अग्रवाल हे सुद्धा असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबईला जाण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे पूर्णिमा बुरडे ही अभियंता असलेली महालमधील युवतीही आपल्या आठ मित्र-मैत्रिणींसह शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी गेली होती. विदर्भ एक्स्प्रेसनंतर रात्री सेवाग्राम एक्स्प्रेस व दुरांतोमध्येही कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. यात दुरांतो एक्स्प्रेसचे वेटिंग वाढल्यामुळे यात एक अतिरिक्त स्लिपरक्लास कोच लावण्यात आला होता. (प्रतिनिधी)
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी नागपूरकरांना उत्सुकता लागली असली तरी राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी प्रशासनही सज्ज आहे. शपथविधी सोहळा अद्याप झाला नसल्याने मुंबईतील मुख्यमंत्री कार्यालयातून अद्याप त्यांच्या नागपूर दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम आलेला नाही. त्यामुळे येथील प्रशासनालाही शपथविधीची प्रतीक्षा आहे. असे असले तरी प्रोटोकॉलनुसार सर्व तयारी झाली आहे.
फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याने विदर्भाला त्यांच्या शपथविधीची उत्सुकता लागली आहे. शपथविधीनंतर ते पहिल्यांदा नागपुरात आल्यावर सामान्य कार्यकर्त्यांसह नागरिकांकडूनही त्यांचे भव्य स्वागत होणार आहेच. परंतु प्रोटोकॉलनुसार प्रशासनही आपल्यापरीने तयारीला लागले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ‘रामगिरी’ या त्यांच्या शासकीय बंगल्याला सजवण्याचे काम सुरू आहे तसेच टेलिफोन, इलेक्ट्रीक आदी दुरुस्त ठेवण्याचे कामही सुरू आहे. मुख्यमंत्री हे पहिल्यांदाच नागपुरात येतील तेव्हा विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉलनुसार जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहतील. यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, नासुप्रचे सभापती यांचा प्रामुख्याने समावेश राहील. विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा पहिला मान हा पदाधिकाऱ्यांचा असतो. त्यानंतर अधिकारी असतात.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊन नागपुरात येताच मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या खास ‘होंडा सिटी व स्कोडा’ या दोन गाड्या सज्ज आहेत. या दोन्ही गाड्या सध्या रामगिरी येथे आहे. मुख्यमंत्री जेव्हाकधी नागपुरात येतात तेव्हा या दोन्ही गाड्या त्यांच्या सेवेत असतात. यासोबतच उपजिल्हाधिकारी दर्जाचे दोन ते तीन अधिकारी त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून राहतील. मुख्यमंत्र्यांचा अधिकृत कार्यक्रम अद्याप आला नसल्याने अधिकाऱ्यांची नावे निश्चित झालेली नाहीत.
फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी शहरातील अनेक मान्यवर शुक्रवारी विमानाने रवाना होणार आहे. नागपूर-मुंबई हवाईमार्गावर गेल्या काही काळापासून गर्दी वाढलेली दिसून येत आहे. त्यातच फडणवीस यांच्या शपथविधीमुळे तिकीट बुक करण्यासाठी अक्षरश: उड्या पडल्या. विमान कंपन्यांनीदेखील दिवाळीनंतर लगेच आलेली ही संधी लक्षात घेता तिकीटाचे दर अव्वाच्या सव्वा वाढविले आहेत. जवळपास प्रत्येकच कंपनीने सामान्यपेक्षा चार पटांहून अधिक दर वाढविले आहेत. शुक्रवारी सकाळी मुंबईला जाणाऱ्या विमानाचे सर्वात कमी दर १२,२४९ रुपये इतके आहेत. गुरुवारी रात्री एअर इंडियाच्या सकाळच्या विमानात केवळ एकच जागा शिल्लक होती व या एका जागेसाठी तिकीटाचे दर चक्क २३,९६६ रुपये इतके होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास बोटावर मोजण्याइतपत उरलेल्या ‘सीट्स’चे दर ३० हजारांच्या वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Celebration for C.M.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.