पाथर्डी हत्याकांडाविरोधात सेलीब्रेटी उतरले रस्त्यावर
By Admin | Updated: November 16, 2014 01:05 IST2014-11-16T01:05:54+5:302014-11-16T01:05:54+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी शिवाजी पार्क येथे हिंसाचारविरोधी निर्धार मोर्चा काढला.

पाथर्डी हत्याकांडाविरोधात सेलीब्रेटी उतरले रस्त्यावर
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी शिवाजी पार्क येथे हिंसाचारविरोधी निर्धार मोर्चा काढला. राष्ट्रीय एकता मंच आयोजित या मोर्चात सेलीब्रेटींनीही सहभाग घेतला. या वेळी हत्याकांडाच्या तपासाकरिता न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास समितीची स्थापना करावी ही मुख्य मागणी करण्यात आली.
दलित लोकांवरील अन्याय वाढतच आहे. त्यामुळे आजही लोक भीतीच्या छायेत वावरत आहेत. सर्व जातींना एकत्रित ठेवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत या उद्देशाने या निर्धार मार्चचे आयोजन केल्याचे राष्ट्रीय एकता मंचचे सरचिटणीस मधू मोहिते यांनी सांगितले. या हिंसाचारविरोधी निर्धार मार्चमध्ये अतुल परचुरे, सोनाली कुलकर्णी, मनवा नाईक, सुभाष अवचट, मीना नाईक, विजय केंकरे, रत्नाकर मतकरी, जब्बार पटेल, अरुण नाईक, विजया राजाध्यक्ष यांनीही सहभाग घेतला होता.
तसेच या प्रकरणातील आरोपींविरोधात तत्काळ कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. अन्यायग्रस्तांचे पुनर्वसन आणि संरक्षणाचीही जबाबदारी विशेष तपास समितीने घ्यावी या मागण्या करण्यात आल्या. या वेळी ‘भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आणि अधिकारांच्या रक्षणासाठी सर्व जाती-धर्मामध्ये राष्ट्रीय एकात्मता जपली जावी यासाठी मी कटिबद्ध आहे’ अशी शपथ निर्धार मार्च दरम्यान राष्ट्रीय एकता मंचचे अध्यक्ष हुसेन दलवाई यांनी घेतली. तर या संदर्भात पुढील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय एकता मंचचे सरचिटणीस मधू मोहिते यांनी दिली. (प्रतिनिधी)
च्पाथर्डी हत्याकांड हे निर्घृण कृत्य आहे, अशा घटनांचा निषेधच आहे. मात्र आजही एकमेकांना जातीबद्दल विचारतो, हेसुद्धा चुकीचे आहे. याचाच निषेध नोंदविण्यासाठी मी या निर्धार मार्चमध्ये सहभागी झाल्याचे अभिनेत्री मनवा नाईकने सांगितले.