टँकरभरणा केंद्रावर सीसीटीव्हीची ‘नजर’

By Admin | Updated: July 31, 2016 05:09 IST2016-07-31T05:09:55+5:302016-07-31T05:09:55+5:30

महापालिकेच्या जलवाहिन्यांतून नाममात्र दरामध्ये पाणी मिळवून त्याचा काळाबाजार करणाऱ्या टँकरमाफियांना लवकरच चाप बसणार

CCTV 'eye' at Tankerbarna center | टँकरभरणा केंद्रावर सीसीटीव्हीची ‘नजर’

टँकरभरणा केंद्रावर सीसीटीव्हीची ‘नजर’

शेफाली परब-पंडित,

मुंबई- महापालिकेच्या जलवाहिन्यांतून नाममात्र दरामध्ये पाणी मिळवून त्याचा काळाबाजार करणाऱ्या टँकरमाफियांना लवकरच चाप बसणार आहे. पाणीभरणा केंद्रावरून टँकर मालकांना बेसुमार पाणीवाटप होत असल्याचे उजेडात आल्यानंतर पालिकेने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार टँकरमालक पाणी घेत असलेल्या पालिकेच्या सर्वच केंद्रांवर जलमापके आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच ठेवण्यात येणार आहे.
अपुऱ्या पावसामुळे गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. या काळात पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेच्या टोकाला असलेल्या रहिवाशांचे हाल झाले. अशा वेळी पाण्यासाठी अनेक ठिकाणी टँकरवाल्यांची मागणी वाढली होती. दामदुप्पट रक्कम मोजून नागरिक पिण्याचे पाणी खरेदी करीत होते. नागरिकांच्या याच असाहाय्यतेचा फायदा टँकरचालकांनी उठविला होता. मुंबईतील १८ टँकर फिलिंग पॉइंट्सवर टँकर मालकांना पाणी खरेदी करता येते.
मात्र या टँकर फिलिंग पॉइंटवर पाण्याचे बेसुमार वाटप होत असल्याची तक्रार येऊ लागली. पाणीटंचाईच्या काळात जलतरण तलाव व बांधकामांचे पाणी बंद करण्यात आले होते. मात्र बक्कळ पैसा कमविण्यासाठी टँकरमालक पिण्याचे पाणी बांधकामांच्या ठिकाणीही पुरवीत असल्याचे उजेडात आले होते. टँकर मालकांचे हे दुकान बंद करण्यासाठी पाणी भरणा केंद्रावर नियमांनुसार मोजमापूनच पाणी टँकरमध्ये भरले जाईल, याची खबरदारी पालिका आता घेणार आहे.
धोरण तयार होणार
टँकर मालक पिण्याचे पाणी घेऊन बांधकामांच्या ठिकाणी त्याची विक्री करीत असल्याचेही उजेडात आले आहे. पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात यावे, असा नियम आहे. मात्र पिण्याच्या पाण्याचा असा गैरवापर होत असल्याने पालिकेने खासगी टँकर मालकांना पाणीपुरवठा करण्याबाबत धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
>टँकर मालकांना शिवसेना पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपाने केला होता. यामुळे पाण्यावरून मित्रपक्षातच वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर हे धोरण तयार करण्याचा निर्णय झाला.
पाणीभरणा केंद्रावरून टँकरला नियमांनुसार पाण्याचे वाटप होईल, याची खात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने करता येईल. मात्र, या पाण्याची विक्री टँकरचालक कुठे व किती करतात, यावर वॉच कसा ठेवणार, हा पेच असून टँकरवर व्हेईकल ट्रॅकिंग सीस्टम हे यंत्र बसवण्याचा पर्याय पुढे आला आहे.
पालिकेच्या १८ टँकर पाणी भरणा केंद्रांवर टँकर मालकांना पाणी घेता येते. पाणीटंचाईच्या काळातही ४८ हजार १८० टँकर मालकांनी जानेवारी ते एप्रिल २०१६ या काळात मुंबईत पाण्याची विक्री केली. यामध्ये पालिकेच्या ९१८१ आणि ३८ हजार खासगी टँकरचा समावेश होता.
१ जानेवारी ते १० मार्चपर्यंत पालिकेने ३९ हजार लीटर्स पाण्याची विक्री खासगी टँकर मालकांना केली होती.
>असा सुरू आहे पाण्याचा काळाबाजार
पालिकेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा झाल्यास त्या सोसायटीला पाण्याच्या दरानुसार शुल्क आकारण्यात येते़ मात्र खासगी टँकर मालक यासाठी दामदुप्पट शुल्क आकारत आहेत़
१० ते २० हजार लीटर पाण्यासाठी दक्षिण मुंबईत ६०० रुपये असलेला दर उन्हाळ्यात अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचतो़, तर मध्य मुंबईत हाच दर १६०० ते १८०० असतो़
उपनगरांमध्ये १३०० ते १५०० रुपये आकारण्यात येतात़ पालिका आणि वाहतूक पोलिसांना थोडी चिरीमिरी द्यावी लागत असल्याने एवढा दर लावण्यात येतो, असे खासगी टँकर मालक सांगतात़
पिण्याव्यतिरिक्त आंघोळ, कपडे, भांडी व लादी धुणे, गाडी धुणे, बागकाम अशा कामांसाठी ६० टक्के पाणी वाया जात असते़ टँकरचा पाणीपुरवठा या कामासाठी होणे अपेक्षित आहे़ टँकर लॉबी दररोज सुमारे १६० दशलक्ष लीटर पाणी उचलत असल्याचा अंदाज आहे़ मात्र यावर पालिकेचे नियंत्रण नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले़

Web Title: CCTV 'eye' at Tankerbarna center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.