ईशान्य मुंबईवर सीसीटीव्हीची नजर

By Admin | Updated: September 27, 2016 01:12 IST2016-09-27T01:12:52+5:302016-09-27T01:12:52+5:30

सव्वा कोटीहून अधिक मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. उत्तर-पूर्व मुंबईत १८८० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत.

CCTV eye on North East Mumbai | ईशान्य मुंबईवर सीसीटीव्हीची नजर

ईशान्य मुंबईवर सीसीटीव्हीची नजर

- जमीर काझी,  मुंबई

सव्वा कोटीहून अधिक मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. उत्तर-पूर्व मुंबईत १८८० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. तेथील सर्व महत्त्वाची ठिकाणे आणि प्रमुख मार्गांवर आता कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांची २४ तास नजर राहणार आहे. तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील कामाच्या पूर्ततेसाठी मात्र नवे वर्ष उजाडणार आहे. या टप्प्यात मध्य-पश्चिम मुंबईत १८८० कॅमेरे बसविले जाणार असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबई नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असते. २६/११च्या हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. मात्र कॅमेऱ्यांचा दर्जा आणि किमतीबाबत पोलीस महासंचालक व गृह विभागामध्ये मतभेद असल्याने निविदा प्रक्रियेतच प्रस्ताव रखडला होता. अनेकवेळा निविदा काढूनही दर्जा आणि अटींमुळे एकही इच्छुक उत्पादक कंपनी पात्र ठरत नव्हती. त्यात तब्बल सात वर्षे गेली. ७ फेबु्रवारी २०१५ला राज्य सरकारने त्यासाठी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी सामंजस्य करार केला. सुरुवातीला मुंबई शहर व उपनगरांत ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर संख्या ४६९७पर्यंत कमी करण्यात आली.
तीन टप्प्यांत हे काम पूर्ण केले जात असून, त्यासाठी सप्टेंबर २०१६ची मुदत निश्चित केली होती. मात्र ‘लार्सन’ला सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करता आले आहे. त्याचा अहवाल नुकताच मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह विभागाकडे पाठविला.
पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईत ९३७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. आता उत्तर-पूर्व मुंबईत १८८० कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कामाच्या मोबदल्यात कंपनीला ११३ कोटी २५ लाख ७,२६१ रुपये वितरित करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

उर्वरित निधी प्रकल्प पूर्ण झाल्यावर
- मुंबईतील प्रमुख ठिकाणी जागतिक दर्जाचे उच्च क्षमता असलेले १४९२ कॅमेरे, तर २० थर्मल आणि ४ हजार ८५० फिक्स बॉक्स कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने ६ जानेवारी २०१४मध्ये ६०० कोटींचा निधी निश्चित केला होता. त्यानंतर २ फेबु्रवारी २०१६ला झालेल्या बैठकीत ३४९ कोटींची वाढ करण्यात आली.

या भागांवर ‘वॉच’ : पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील
कॅमेरे कार्यान्वित केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विक्रोळी, मुलुंड, भांडुप (प.), मानखुर्द, शिवाजीनगर व घाटकोपर पूर्व व पश्चिम या भागातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी १८८० कॅमेरे बसविलेले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात इतकेच कॅमेरे मध्य - पश्चिम भागात बसविले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

- कॅमेरे बसविणे व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त, गृह सचिव (विशेष), ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’चे प्रतिनिधी, प्रणाली एकात्मिक समितीचे सदस्य आणि गृह विभागाच्या पोल-३च्या उपसचिवांचा समावेश आहे.

Web Title: CCTV eye on North East Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.