एक्स्प्रेस वे वर बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे
By Admin | Updated: June 8, 2014 00:12 IST2014-06-07T22:00:16+5:302014-06-08T00:12:38+5:30
एक्स्प्रेस वे वर बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे

एक्स्प्रेस वे वर बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे
आर. आर. पाटील : पोलिसांची रिक्त पदे भरणार
अपघात रोखण्यासाठी ३ महिन्यांत कृती आराखडा
ेमुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील अपघात रोखण्यासाठी स्पीड गन, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना रस्ते विकास महामंडळाला देण्यात आल्या असून, अपघात रोखण्याच्यादृष्टीने तीन महिन्यांत कृती आराखडा सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी विधान परिषदेत दिली.
याबाबतचा तारांकीत प्रश्न काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, ७७ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महामार्गावर ताशी ११० किमी वेगमर्यादा शक्य असूनही तो केवळ ८० किमी ठेवण्यात आला आहे. अपघातप्रवण क्षेत्राची माहिती एमएसआरडीसीला देण्यात आली आहे, असे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.
वाहतूक नियम तोडल्यानंतर आकारण्यात येणार्या दंडाची रक्कम अगदीच किरकोळ असल्याने त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. त्यामुळे दंडाच्या रकमेत वाढ करण्याची विनंती केंद्र सरकारकडे यापूर्वीच करण्यात आली आहे. महामार्गावर वाहने थांबवून दंड वसुली करणे अशक्य असल्याने यापुढे थेट बँक खात्यातील दंडाची रक्कम वसूल करणे तसेच वाहन परवाना रद्द करण्याचा पर्याय विचाराधीन आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. तसेच महामार्गावरील व्यवस्था वाढविण्यासाठी पोलिसांची रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)