‘आरटीओ’त लावणार सीसीटीव्ही
By Admin | Updated: December 16, 2014 03:18 IST2014-12-16T03:18:22+5:302014-12-16T03:18:22+5:30
मुंबईतील आरटीओ कार्यालयातील अनधिकृत दलाल आणि अधिकाऱ्यांत संगनमताने भ्रष्टाचार सुरू असल्यास त्यावर लक्ष ठेवण्याकरिता कार्यालयांत सीसीटीव्ही बसवण्यात येतील,

‘आरटीओ’त लावणार सीसीटीव्ही
नागपूर : मुंबईतील आरटीओ कार्यालयातील अनधिकृत दलाल आणि अधिकाऱ्यांत संगनमताने भ्रष्टाचार सुरू असल्यास त्यावर लक्ष ठेवण्याकरिता कार्यालयांत सीसीटीव्ही बसवण्यात येतील, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.
अॅड. अनिल परब यांनी मुंबईतील अंधेरी, ताडदेव व वडाळा येथील आरटीओ कार्यालयातील दलालांचा सुळसुळाट व भ्रष्ट अधिकारी याबाबत लक्षवेधी मांडली होती. अंधेरीतील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून दलाल पैसे घेतात, असा आरोप परब यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. रावते म्हणाले, परिवहन विभागाच्या आवारात दलालांची कार्यालये नाहीत. शिवाय उच्च न्यायालयाने २००७ साली दिलेल्या एका निवाड्यात आपल्या कामाकरिता अशी एखाद्याची नियुक्ती करण्यात काही गैर नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. तरीही गेल्या काही वर्षांत संगणकीय पद्धतीने लोकांना घरपोच परवाने देण्याचे धोरण सरकारने राबवले आहे. मात्र तरीही भ्रष्टाचार उघड करण्याकरिता सीसीटीव्ही बसवले जातील. पासपोर्ट कार्यालयातील दलालांचा सुळसुळाट आता बंद झाला असून प्रत्यक्ष अर्जदाराला तेथे जावे लागते. तशी व्यवस्था करण्याची मागणी राहुल नार्वेकर यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)