पोलीस कार्यपद्धतीचे फुटले बिंग, आंधळकरला सीबीआय कोठडी
By Admin | Updated: April 8, 2016 00:41 IST2016-04-08T00:41:15+5:302016-04-08T00:41:15+5:30
माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणात केंद्रिय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर याला अटक केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीचे बिंग फुटले आहे.

पोलीस कार्यपद्धतीचे फुटले बिंग, आंधळकरला सीबीआय कोठडी
पिंपरी : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणात केंद्रिय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर याला अटक केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीचे बिंग फुटले आहे. २०१० मध्ये घडलेले हे खून प्रकरण हाताळताना आंधळकर या अधिकाऱ्याची कृती संशयास्पद असल्याचे सीबीआय
तपासात निष्पन्न झाले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या शेट्टी खून प्रकरणाला सीबीआयच्या कारवाईमुळे वेगळे वळण मिळाले आहे.
मावळातील शेतकऱ्यांच्या जमीनखरेदीत खोटे दस्तऐवज झाल्याचे प्रकरण माहिती अधिकार कार्यकर्ते शेट्टी यांनी चव्हाट्यावर आणले. तसेच अन्य जमीन घोटाळे, गैरव्यवहार, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्याचे काम करीत असताना, जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात येताच त्यांनी २३ नोव्हेंबर २००९ला पोलीस संरक्षण मिळावे, असा अर्ज केला होता. त्यांना पोलीस संरक्षण तर मिळाले नाहीच, मात्र व्हायचे तेच झाले; १३ जानेवारी २०१० ला त्यांचा खून झाला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटकही केली होती. शेट्टी खून प्रकरणातील मूळ सूत्रधार मात्र हाती लागले नाहीत. सुरुवातीला तळेगाव पोलिसांकडून शेट्टी खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे गेला.
गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आंधळकर याच्याकडे तपास आल्यानंतर तपास होण्याऐवजी आरोपी मोकाट सुटतील, या दृष्टीने त्याने कामगिरी केली. ही बाब लक्षात येताच
सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप
शेट्टी यांनी हे प्रकरण केंद्रिय
गुन्हे अन्वेषण शाखेकडे (सीबीआय) सोपविण्यात यावे, अशी मागणी केली. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली
असल्याचे सीबीआय तपासात निदर्शनास आले आहे. ज्यांचा या खूनप्रकरणाशी संबंध आला, त्यातील काहींची आर्थिक
परिस्थिती अचानक सुधारल्याचे दिसून आले आहे. आंधळकर याच्यासह काहीजण मालामाल झाल्याचे सीबीआय अहवालातून दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
--------------
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निवृत्त निरीक्षक भाऊसाहेब आंधळकरला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आंधळकरला बुधवारी अटक केली होती.
भ्रष्टाचारविरोधी दक्षता समितीचे जिल्हा संघटक असलेल्या सतीश भोज्जा शेट्टी यांची १३ जानेवारी २०१० रोजी सकाळी तळेगाव दाभाडे येथे प्रभात फेरी मारण्यासाठी जात असताना, धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास तळेगाव दाभाडे पोलिसांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला होता. त्या वेळी आंधळकर एलसीबीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. एलसीबीने अटक केलेल्या सहा जणांमध्ये तळेगाव येथील एका वकिलाचादेखील समावेश होता.
त्याला गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्याचे समर्थक; तसेच वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर, त्यांना तुम्हाला सीबीआयविरुद्ध काही तक्रार आहे का? अशी विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले.
गुन्ह्याच्या कटाचा शोध घ्यायचा आहे, आंधळकरच्या तपासामधून महत्त्वाची माहिती व धागेदोरे उलगडे जाण्याची शक्यता असून, यातून नेमके सत्य बाहेर येईल, असा युक्तिवाद सीबीआयचे वरिष्ठ सरकारी वकील अतुल कुमार यांनी केला. तसेच, गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यासाठी; तसेच आंधळकरने तपासामध्ये सहकार्य केले नसून, ते काही गोष्टी लपवत असल्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती सीबीआयचे तपास अधिकारी उपअधीक्षक (सीबीआय विशेष शाखा) विजय शुक्ला यांनी केली. दरम्यान, या प्रकरणात सीबीआयने यापूर्वीच क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून, त्यांची पॉलिग्राफ चाचणीदेखील झाली आहे, रिमांड अहवालामध्ये एकही पुरेसे कारण नसल्याचे सांगत आंधळकरला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी बचाव पक्षाच्या वतीने अॅड. सुधीर शहा यांनी केली.(प्रतिनिधी)