हत्येचे कारण सीबीआय शोधणार

By Admin | Updated: September 20, 2015 00:21 IST2015-09-20T00:21:51+5:302015-09-20T00:21:51+5:30

शीना बोरा हत्येमागचा उद्देश सोडून या प्रकरणाच्या तपासाचा इतर सर्व तपशील मुंबई पोलीस केंद्रीय गुप्तचर यंत्रणा (सीबीआय) देणार आहे. या हत्येचा तपास सीबीआयला देण्याचा

CBI searches for reason of murder | हत्येचे कारण सीबीआय शोधणार

हत्येचे कारण सीबीआय शोधणार

- डिप्पी वांकाणी,  मुंबई
शीना बोरा हत्येमागचा उद्देश सोडून या प्रकरणाच्या तपासाचा इतर सर्व तपशील मुंबई पोलीस केंद्रीय गुप्तचर यंत्रणा (सीबीआय) देणार आहे. या हत्येचा तपास सीबीआयला देण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबई पोलिसांकडून हे स्पष्टीकरण आले.
या हत्येमागचा उद्देश काय हे सीबीआयनेच शोधून काढावे, अशी सरकारची इच्छा आहे. या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. या हत्येमध्ये अनेक उद्देश असू शकतात, असे अतिरिक्त मुख्य गृहसचिव के.पी. बक्षी यांनी शुक्रवारी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘आम्ही तपासाचा सर्व तपशील सीबीआयला देणार आहोत; मात्र हत्येचा उद्देश सीबीआयच शोधून काढेल.’ शीना बोराची हत्या का झाली? यामागचा उद्देश काय याबाबत मुंबई पोलिसांनी आतापर्यंत कोणतेही भाष्य केलेले नाही.
या प्रकरणाचा तपास करताना सापडलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांबद्दल मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे; मात्र इंद्राणी मुखर्जी आणि शीना यांच्यातील वैयक्तिक व आर्थिक वादातून हे प्रकरण घडले असावे, असा संशय व्यक्त केला गेला आहे. शीना तसेच इंद्राणीचा तिसरा पती पीटर मुखर्जी याचा मुलगा राहुल यांचा लग्नाचा विचार होता. मुख्यत्वे यामुळेच इंद्राणी अस्वस्थ होती आणि त्यातूनच शीनाची हत्या झाल्याचा संशय आतापर्यंत व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आणखी एक पैलू समोर आला आहे. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांच्यातील संबंध संपुष्टात येतील, अशी काही संवेदनशील माहिती शीना जाहीर करण्याबाबत इंद्राणीला ब्लॅकमेल करीत होती. त्याचबरोबर नावावर ठेवण्यात आलेले पैसे शीना परत करण्यास नकार देत होती. त्यातूनही इंद्राणीने तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरीही या हत्येमागचा निश्चित हेतू काय? हे पोलीस ठामपणे सांगू शकले नाहीत. त्यावर आता सीबीआयच प्रकाश टाकू शकेल, असे एक अधिकारी म्हणाला.

काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे सीबीआयला शोधावी लागणार आहेत, ती याप्रमाणे -
- शीनाच्या हत्येमागचा निश्चित हेतू काय?
- शीनाला ठार मारण्याचा कट नेमका केव्हा रचला गेला?
- शीना-पीटर-राहुल यांच्यातील समीकरण काय?
- शीनाकडे इंद्राणीची कोणती खासगी माहिती होती?
तिचा इंद्राणीच्या जीवनावर काय परिणाम झाला असता?
- त्यातून तिची हत्या केल्याचा कट रचला गेला काय?
- या प्रकरणातील चौथ्या व्यक्तीचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. तो कोण? आरोपींच्या कोठडीची मुदत वाढवून घेताना न्यायालयापुढे पोलिसांनी याबाबत वाच्यता केली होती.
- या प्रकरणाशी संबंधित प्रत्येकाचेच व मुखर्जी दाम्पत्याच्या कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध काय? या प्रकरणातील आर्थिक गैरप्रकाराचे स्वरूप काय? त्यात या मोठ्या कॉर्पोरेट हाउसमधील आर्थिक घोटाळ्यावर प्रकाश पडेल काय?
- शीनाच्या हत्येनंतर मिखाईलचाही खून करण्यात येणार होता; पण गेल्या तीन वर्षांत त्याचावर हल्ला का झाला नाही?
- शीना बेपत्ता झाल्यानंतर तिच्या एकाही नातेवाइकाने ती बेपत्ता असल्याची तक्रार का नोंदवली नाही?

Web Title: CBI searches for reason of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.