जवखेडा हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा
By Admin | Updated: December 11, 2014 00:49 IST2014-12-11T00:49:37+5:302014-12-11T00:49:37+5:30
आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी आमचाच छळ चालवला आहे. खऱ्या गुन्हेगारांना सोडून उलट आता पोलिसांनी आमच्याच कुटुंबावरच संशय घ्यायला सुरु वात केली आहे.

जवखेडा हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा
आंबेडकरी समाज आणि धार्मिक अल्पसंख्यक समाज संघर्ष समिती
नागपूर : आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी आमचाच छळ चालवला आहे. खऱ्या गुन्हेगारांना सोडून उलट आता पोलिसांनी आमच्याच कुटुंबावरच संशय घ्यायला सुरु वात केली आहे. पोराच्या खुनात पुतण्याला गोवण्यात आले आहे. पोलीस ‘लुचाड’ असतील पण माझा समाज नाही. तो माझ्या पाठीशी आहे, या हत्याकांडाची चौकशी सीबीआयकडून करा, अशी मागणी मृत संजय याचे वृद्ध आई-वडील साखराबाई, जगन्नाथ जाधव व त्यांच्या कुटुंबीयांनी केली.
महाराष्ट्रभर सामाजिक असंतोषाला कारणीभूत ठरलेल्या जवखेड्यातील क्रूर तिहेरी दलित हत्याकांडाच्या निषेधार्त आंबेडकरी समाज आणि धार्मिक अल्पसंख्यक समाज (बौद्ध, मुस्लीम, शीख, ख्रिश्नच) संघर्ष समितीच्यावतीने आज बुधवारी विधानभवनावर धडकलेल्या मोर्चात ते बोलत होते. घटनेची माहिती देताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. या मोर्चाचे नेतृत्व भिक्खु संघाने केले. यावेळी संघानुशासक भदंत सदानंद महास्थिवर, भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भदन्त सदानंद महास्थिवर, भदन्त विमलकीर्ती गुणसिरी यांच्यासह सरदार इक्बालसिंग सल्होत्रा, मौलाना क्वाद्री उपस्थित होते.
श्याम गायकवाड म्हणाले, जवखेडा येथील संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री व मुलगा सुनील याची अमानुष हत्या करण्यात आली. या घटनेला एक महिना उलटून गेला. परंतु पोलिसांना आरोपींचा छडा लावण्यास अपयश आले आहे. यामुळे त्यांनी जाधव कुटुंबातीलच लोकांवर खाटे आरोप लावून त्यांना ताब्यात घेणे सुरू केले आहे. आंबेडकरी जनतेला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे, असेही ते म्हणाले. आंबेडकरी विचारवंत प्रदीप आगलावे म्हणाले, आम्ही संघटित नसल्याने असे भ्याड हल्ले होत आहेत. आतातरी संघिटत व्हा, जाधव कुटुंबीयाच्या पाठिशी राहा, असे आवाहनही त्यांनी केले. सल्होत्रा म्हणाले, अशा घटना नेहमीच दलित आणि अल्पसंख्यकांसोबतच होतात. यामुळे सर्वांनी एक होऊन लढा उभारणे आवश्यक आहे. भदन्त विमलकीर्ती गुणसिरी म्हणाले, संघाच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे. आता कोणत्याही समाजाच्या माणसावर अन्याय झाल्यास हा संघ त्याच्या पाठीशी राहील, असेही ते म्हणाले. भंते सुरई ससाई म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या मोर्चात यायला हवे होते. आंबेडकरी जनतेचा हा संताप त्यांनी अनुभवायला हवा होता. मी स्वत: त्यांना या प्रकरणात पोलीस कसे चुकतात आहेत, याची माहिती देणार आहे, असे म्हणत त्यांनी संघटित राहण्याचे आवाहन केले. यावेळी मौलाना क्वाद्री, डॉ. सुचित बागडे, योगेश वऱ्हाडे, प्रा. रणजित मेश्राम, तक्षशीला वाघधरे, संजय जीवने, किशोर गजभिये, अशोक सरस्वती यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. मोर्चाच्या आयोजनासाठी अमन कांबळे, नारायण बागडे, सुरेश तेलंग, घनश्याम फुसे, पी.एस.खोब्रागडे, राहुल मून आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार -राम शिंदे
जवखेडा हत्याकांडाबाबत बुधवारी करण्यात आलेल्या आंदोलनातील शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यात सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करून दलित अन्याय-अत्याचाराच्या सर्व घटनांना त्वरित निकाली काढण्यात यावे, जाधव कुटुंब व त्यांचे संबंधित नातेवाईकांना संरक्षण द्यावे, मॅटने दिलेल्या पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात शासनाच्यावतीने आव्हान देण्यात यावे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, भगवद्गीता संदर्भातील मागणी मान्य करण्यात येऊ नये व दलित, बौद्ध, शीख, मुस्लीम आणि ख्रिश्चन या सर्व अल्पसंख्यक समाजांच्या हितांचे संरक्षण करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या. त्यावर राम शिंदे म्हणाले, हे प्रकरण गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांसमोर या मागण्या मांडून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.