शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे
By Admin | Updated: September 18, 2015 18:02 IST2015-09-18T18:02:13+5:302015-09-18T18:02:30+5:30
बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे. राकेश मारिया व अहमद जावेद यांच्यापैकी कोणाकडे तपास राहणार यावरुन चर्चा रंगली असतानाच राज्याच्या गृहखात्याने हा निर्णय घेतला आहे. निष्पक्ष तपास होऊन जनतेच्या मनात कोणताही संभ्रम कायम राहू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे राज्याच्या गृहसचिवांनी म्हटले आहे.
शीना बोरा हत्याप्रकरणात इंद्राणी मुखर्जीसह तिघा जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त राकेश मारिया हे स्वतः याप्रकरणाचा तपास करत होते. मात्र मारियांना बढती देत त्यांची तडकाफडकी पोलिस महासंचालक (होमगार्ड) या पदावर बदली करण्यात आल्याने या प्रकरणाला नवीन वळण मिळाले. शीना बोरा प्रकरणामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राकेश मारियांची बदली केल्याचा दावाही केला जात होता. बदली केल्यानंतरही या प्रकरणाचा तपास राकेश मारियांकडेच राहील अशी चर्चा रंगू लागली होती. मुंबई पोलिस आयुक्तपदी अहमद जावेद यांची नियुक्ती झाली असताना या प्रकरणाचा तपास राकेश मारियांकडे देणे यावरही आक्षेप घेतला जात होता. तर दुसरीकडे अहमद जावेद हे काही महिन्यांपूर्वी पीटर मुखर्जींना भेटले होते असे वृत्त झळकले होते. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्याचे गृहसचिव के पी बक्षी यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा तपास थेट सीबीआयकडे सोपवत असल्याचे जाहीर केले.
शीना बोरा प्रकरणात गृहखात्याने राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून अहवाल मागवला होता. पोलिस महासंचालकांनी मुंबई पोलिस आयुक्तांचेही मत जाणून घेतले होते. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावा व हत्येतील आर्थिक पैलूही समोर यावा यासाठी या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे देत आहोत असे बक्षी यांनी स्पष्ट केले.