कर्जाने पिचलेल्या शेतकऱ्यांचा ‘क’ वर्ग
By Admin | Updated: February 10, 2015 02:19 IST2015-02-10T02:19:11+5:302015-02-10T02:19:11+5:30
विदर्भ व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या, प्रापंचिक समस्यांनी गांजलेल्या आणि कर्जाच्या

कर्जाने पिचलेल्या शेतकऱ्यांचा ‘क’ वर्ग
संदीप प्रधान, मुंबई
विदर्भ व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या, प्रापंचिक समस्यांनी गांजलेल्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेल्या शेतकऱ्यांचा ‘क ’वर्ग निर्माण केला जाणार आहे. अन्नसुरक्षेपासून पेन्शनपर्यंत सर्व सरकारी योजनांचा लाभ मुख्यत्वे याच शेतकऱ्यांना देऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले जाणार आहे.
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी फुलंब्री, पैठण व औरंगाबाद या परिसरातील ३० हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून अशा ‘क’ वर्गातील २ हजार शेतकऱ्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केली आहे. आता पुन्हा सर्वेक्षण करून अत्यंत अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार केली जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये राज्यात शेतकऱ्यांचा ‘क’ वर्ग शोधून काढण्याची आग्रही मागणी कदम यांची होती. यामुळे मागील मंत्रिमंडळ बैठकीत विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी एका जिल्ह्यात सर्वेक्षण करून कदम यांची कल्पना साकारते काय हे तपासणीचे आदेश दिले होते.
शेतकऱ्यांकडून एकूण १५ प्रश्नांची उत्तरे घेतली जातील. यात कौटुंबिक माहितीसह, इतर उत्पन्नाचे साधन, बँक-सोसायटी-खासगी कर्ज, धार्मिक कार्य किंवा विवाहाची तरतूद, विम्याचे संरक्षण आणि कमावत्या व्यक्ती याचा समावेश असेल. हे सर्वेक्षण त्याच गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, अंगणवाडी सेविका व डॉक्टर करणार असल्याने फसवाफसवी करून ‘क’ वर्ग पदरात पाडून घेण्याची क्लृप्ती करण्यास वाव राहणार नाही. या सर्वेक्षणानंतर मोठ्या व सधन शेतकऱ्यांचा ‘अ’ वर्ग, आर्थिक परिस्थितीचे नेटके नियोजन केलेल्या शेतकऱ्यांचा ‘ब’ वर्ग आणि संकटात असलेल्या व कदाचित जीवनयात्रा संपवण्याचा विचार करू शकणाऱ्या शेतकऱ्यांचा ‘क’ वर्ग तयार केला जाईल. (प्रतिनिधी)