शिक्षकांनाही ‘कॅशलेस’ सुविधा
By Admin | Updated: April 8, 2015 01:20 IST2015-04-08T01:20:30+5:302015-04-08T01:20:30+5:30
राज्यातील पोलीस अधिकारी - कमर्चारी व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना लागू असणारी कॅशलेस योजना शिक्षक - शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू

शिक्षकांनाही ‘कॅशलेस’ सुविधा
मुंबई : राज्यातील पोलीस अधिकारी - कमर्चारी व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना लागू असणारी कॅशलेस योजना शिक्षक - शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली.
शिक्षक आमदार कपिल पाटील, प्रा. श्रीकांत देशपांडे आदी सदस्यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांना कॅशलेस कार्डाची योजना लागू नाही. त्यामुळे वैद्यकीय बिलाच्या परताव्यासाठी शिक्षक व कर्मचा-यांना प्रचंड दगदग व त्रास सहन करावा लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावर राज्यातील शासकीय कर्मचा-यांसाठी लागू असलेली आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील खर्चाची प्रतिपूर्ती योजना राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांना लागू आहे. मात्र, कर्मचा-यांनी खर्च मंजूरीसाठी सादर केल्यानंतर प्रशासकीय दिरंगाईमुळे वेळेवर खर्चाची रक्कम मिळत नाही. त्यामुळे या कर्मचा-यांसाठी कॅशलेस कार्ड योजना सुरु करण्याचा शासन विचार करत आहे. तसेच, राज्यातील शिक्षकांना कोणकोणते आजार उद्भवतात त्याची माहिती घेण्यात येईल. त्या आजारांचा समावेश राजीव गांधी जीवनदायी योजनेत करण्यासंदर्भात आरोग्य मंत्री, सचिव यांच्याशी चर्चा करुन त्यासंदर्भातलाही निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही तावडे यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)