२५ लाखांची रोकड पकडली
By Admin | Updated: September 25, 2014 01:30 IST2014-09-25T01:30:41+5:302014-09-25T01:30:41+5:30
तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील भरारी पथक मंगळवारी वाहनांची तपासणी करीत असताना एका वाहनात तब्बल २५ लाख रुपयांची रोकड सापडली.

२५ लाखांची रोकड पकडली
सावली (चंद्रपूर) : तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील भरारी पथक मंगळवारी वाहनांची तपासणी करीत असताना एका वाहनात तब्बल २५ लाख रुपयांची रोकड सापडली.
सदर रक्कम टाटा सफारी एम.एच. ३१ डीवाय ०८२८ या वाहनाने चंद्रपूरकडे नेण्यात येत होती.
१० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्याने अधिक चौकशीसाठी उत्पादन शुल्क विभागाला पाचारण करण्यात आले. रक्कम घेऊन जाणारे पंकज साहू (३६) रा. दिल्ली व वाहन चालक सय्यद इम्रान अली (२६) रा. नागपूर यांची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता गडचिरोली जिल्ह्यातील कन्हेरी येथील वायुनंदना पॉवर प्लॉन्ट येथून रक्कम आणण्यात आली असून या पॉवर प्लॉन्टसाठी कच्चा माल पुरविणाऱ्या गुरूनानक कोल अॅन्ड पॉवर प्रा. लि. गडचिरोली यांच्या नावे स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा गडचिरोली येथून धनादेशाद्वारे काढण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यात १ हजार रुपयाच्या नोटांचे पाच बंडल व ५०० रुपयांच्या नोटांचे ४० बंडल असे एकूण २५ लाख रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले. उपरोक्त कारवाई पथकातील विस्तार अधिकारी एस.एस. नैताम, सावलीचे ठाणेदार प्रमोद डोंगरे, सहाय्यक उपनिरीक्षक पी.आर. यादव, हे.कॉ. विजय रिठे, पो.कॉ. प्रमोद डोंगरे, अनुप कवठेकर यांनी केली. पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)