विवाहितेवरील बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

By Admin | Updated: May 30, 2016 02:33 IST2016-05-30T02:33:01+5:302016-05-30T02:33:01+5:30

विवाहितेवर अनेकदा बलात्कार केल्याच्या आरोपावरून गणेश माने या आरोपीविरूद्ध वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला

In the case of rape of a married woman filed a complaint | विवाहितेवरील बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

विवाहितेवरील बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल


ठाणे : विनयभंग करून मोबाइल फोनद्वारे केलेल्या चित्रिकरणाच्या आधारे ब्लॅकमेल करीत डोंबिवलीतील विवाहितेवर अनेकदा बलात्कार केल्याच्या आरोपावरून गणेश माने या आरोपीविरूद्ध वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
दीड वर्षांपूर्वी डोंबिवलीत राहाणारी महिला पती आणि मुलांसह जम्मू येथून परतत होते. एक्स्प्रेसमध्ये तिच्या कुटुंबीयांची गणेश माने याच्याशी ओळख झाली. महिलेचे कुटुंब आणि आरोपी मूळचे साताऱ्यातील असल्याने महिलेच्या पतीने मोबाइल नंबर त्याला दिला. एक्स्प्रेसमध्येच महिलेची मुलगी आईचा फोन घेऊन खेळत असता आरोपीने तो मोबाइल क्रमांकही टिपून घेतला. चुनाभट्टी येथे राहाणाऱ्या आरोपीने मुंबईत आल्यानंतर महिलेच्या पतीशी संपर्क ठेवला. त्यानंतर महिनाभराने पती नसताना आरोपी घरी आला आणि त्याने विनयभंग करीत त्याचे चित्रिकरण केले. विरोध केल्यानंतर निघून गेला. त्यानंतर मुलगी कर्करोगाने आजारी असल्याचे समजल्याने माने याने वैद्यकीय मदत मिळवून देतो, असे सांगून ठाण्याला बोलावले. त्याला नकार दिला असता विनयभंग केल्याची क्लीप आपल्याकडे असून ती तुझ्या पतीला दाखवेन, असे सांगून तो ब्लॅकमेल करू लागला, असे या महिलेच्या तक्रारीत म्हटले आहे. ब्लॅकमेल करण्याची धमकी देत लॉजमध्ये नेऊन बलात्कार केला. त्याचेही चित्रिकरण केल्याची तक्रार महिलेने केली. पोलिसांनी मानेविरूद्ध गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आणखी एका युवतीने आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली. याबाबत राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे या सेक्स स्कँडलच्या चौकशीची मागणी केली आहे.

Web Title: In the case of rape of a married woman filed a complaint