कालबाह्य पूल कोसळण्याच्या स्थितीत
By Admin | Updated: August 5, 2016 02:33 IST2016-08-05T02:33:48+5:302016-08-05T02:33:48+5:30
महाड दुर्घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला असून संभाव्य आपत्तीची चाहूल घेत जिल्हाभरात सतर्कता पाळण्यात आली आहे.

कालबाह्य पूल कोसळण्याच्या स्थितीत
कांता हाबळे,
नेरळ- महाड दुर्घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला असून संभाव्य आपत्तीची चाहूल घेत जिल्हाभरात सतर्कता पाळण्यात आली आहे. मात्र या दुर्घटनेपासून कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने काहीही बोध घेतलेला नाही.
कर्जत तालुक्यातील अनेक पुलांची दुरवस्था झाली आहे. त्यापैकी काही पूल कालबाह्य झाल्याने प्रवासी तसेच वाहनचालकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. पुलाच्या डागडुजीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून महाडसारखी एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
तालुक्यातील अनेक पुलांची स्थिती दयनीय आहे. त्यांची कालबाह्यता लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. कर्जतमधील उल्हास नदीवरील श्रीराम पूल, कर्जत- मुरबाड रस्त्यावरील कळंब येथील पोशीर नदीवरील पूल, नेरळ-कळंब मार्गावरील दहिवली पूल कालबाह्य स्थितीत आहेत. नेरळ रेल्वेस्थानकापासून अवघ्या दोन किमी अंतरावर दहिवली पूल आहे. या पुलावरून दिवसागणिक हजारो वाहने ये -जा करतात.
२६ जुलै २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे या पुलांची दैनावस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. पुराला दशकभराचा कालावधी लोटला तरी अद्याप पुलाची स्थिती जैसे थे आहे. कळंब येथील पोशीर नदीवरील पुलावरूनही दररोज अवजड वाहने जातात. तोही पूल धोकादायक स्थितीत आहे. पुलाच्या सळया बाहेर आल्या असून त्वरित डागडुजी करण्याची गरज आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करण्यात आल्याने अनेक पुलांना धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अवैधरीत्या होत असलेल्या वाळू उपशावर महसूल विभाग कारवाई करताना दिसत नाही. परिणामी पुलाखालचा आधार कमी झाल्याने पूल वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
>नागोठणे
महामार्गावरील वाकण पुलाकडे दुर्लक्ष
नागोठणे : मुंबई - गोवा महामार्गावर महाड येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर शासन आता पूर्णपणे हादरले असून या महामार्गावर असणाऱ्या सर्व जुन्या पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व त्यानंतर महाड दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून सूचित करण्यात आले आहे. नागोठणेनजीक महामार्गावर वाकण नाक्याजवळ असाच एक ब्रिटिशकालीन पूल आहे. प्रचंड अवजड वाहतूक होत असलेल्या या पुलापासूनच महामार्गावरील जुन्या पुलांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ मंडळींकडून पुलाची योग्य तपासणी व्हावी, अशी मागणी अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रायगड जिल्ह्यात अनेक ब्रिटिशकालीन पूल असून सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. नागोठणे परिसरात निडी आणि वाकण या दोन ठिकाणी महामार्गावर ब्रिटिशकालीन पूल आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणात निडी येथे नवीन पूल बांधला असल्याने दोन वर्षांपासून जुन्या पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. वाकण येथे सुद्धा नवीन पूल बांधण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून चालू असून सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या संबंधित ठेकेदार कंपनीला हा पूल उभारण्यास अजून यश आले नसल्याने हजारो वाहनांची वाहतूक या जुन्या पुलावरून होत आहे. मंगळवारी रात्री महाडचा दुर्घटनाग्रस्त पूल आणि वाकणचा पूल एकाचवेळी बांधला असावा असे जाणकार मंडळी सांगतात. सरकारने महाडच्या दुर्घटनेचा बोध घेत मुंबई - गोवा महामार्गावरील सर्वच जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
>कर्जत तालुक्यातील पुलासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती मागितली होती. मात्र ती न मिळाल्याने अपिलीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होऊन १५ दिवसात माहिती देण्याचे आदेश बांधकाम विभागाला देण्यात आले होते. महिना उलटला तरी अद्याप माहिती मिळालेली नाही. यामुळे शासनाच्या आदेशाची खुद्द शासकीय अधिकारीच पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी.
- गो.रा.चव्हाण,
माहिती अधिकार कार्यकर्ते, डिकसळ
कर्जतमधील धोकादायक पुलांची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- चंद्रशेखर सहनाल,
उप अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग
>वाहतुकीस अडथळा
कर्जत येथील ब्रिटिशकालीन श्रीराम पूल देखील कोसळण्याच्या स्थितीत असून या पुलावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. अनेक पुलावरील संरक्षक पाइप तुटल्याने अनेक ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी अनेकदा डागडुजीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेणजवळच्या भोगावती नदीवर नवा पूल बांधून दोन वर्षे झाली आहे. मात्र अनेक दिवस हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता.
भोगवतीवर बांधण्यात आलेल्या जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू आहे. हा पूलही ब्रिटिशकालीन असून कमकुवत झाला आहे.
कर्जत तालुक्यातही अनेक पूल धोकादायक स्थितीत आहेत. त्या पुलांची लवकरात लवकर पाहणी करण्यात यावी व त्यावर उपाययोजना करावी, अन्यथा दुर्घटना घडल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल.
- मनोहर कदम,
पर्यावरण विभाग अध्यक्ष, रायगड जिल्हा
कर्जत तालुक्यातही अनेक पूल खूप जुने आहेत. त्या सर्व पुलांचे सार्वजनिक बांधकाम विभागाने आॅडिट करावे व धोकादायक पुलांची दुरुस्ती करावी तसेच पुलांवरील खड्डे लवकरात लवकर भरावे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- उत्तम कोळंबे,
माजी अर्थ व बांधकाम सभापती राजिप.