वाशीममधील फाशीचे प्रकरण हायकोर्टात

By Admin | Updated: June 23, 2014 01:14 IST2014-06-23T01:14:15+5:302014-06-23T01:14:15+5:30

वाशीम येथील फाशीच्या शिक्षेचे प्रकरण शिक्कामोर्तबासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे सादर करण्यात आले आहे. याप्रकरणातील आरोपीने अत्यंत निर्घृणपणे मृताचे मुंडके शरीरावेगळे करून

Case of death in Washim High Court | वाशीममधील फाशीचे प्रकरण हायकोर्टात

वाशीममधील फाशीचे प्रकरण हायकोर्टात

निर्घृणता : हत्येनंतर मृताचे मुंडके कापून जाळले
नागपूर : वाशीम येथील फाशीच्या शिक्षेचे प्रकरण शिक्कामोर्तबासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे सादर करण्यात आले आहे. याप्रकरणातील आरोपीने अत्यंत निर्घृणपणे मृताचे मुंडके शरीरावेगळे करून जाळले होते.
रमेश जिजेबा लहाने (४२) असे आरोपीचे नाव असून तो दत्तानगर, वाशीम येथील रहिवासी आहे. वाशीम ग्रामीण पोलिसांनी रमेश व त्याची दुसरी पत्नी लक्ष्मीबाई ऊर्फ चतुरा (२९) या दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयाने गेल्या ३ एप्रिल रोजी रमेशला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत मरेपर्यंत फाशी, तर कलम २०१ अंतर्गत ५ वर्षे कारावास व ३००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. लक्ष्मीबाईला सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. याप्रकरणात रामेश्वर काळबांडे, विठ्ठल तानपुरे व जयवंता लहाने यांनाही आरोपी करण्यात आले होते. परंतु, तपासात त्यांचा हत्येशी संबंध नसल्याचे आढळून आले. यामुळे त्यांना आरोपमुक्त करण्यात आले होते.
मृताचे नाव विश्वनाथ लहाने असून तो कारंजी, ता. मालेगाव येथील रहिवासी होता. विश्वनाथ व रमेशमध्ये शेतीच्या सीमेवरून वाद होता. यामुळे रमेशने विश्वनाथचा काटा काढण्याचा कट रचला होता. ५ फेब्रुवारी २०१२ रोजी रात्री विश्वनाथ व रमेश यांनी एकत्र बसून मद्य प्राशन केले. यानंतर रमेशने विश्वनाथची गळा दाबून हत्या केली. यासाठी रमेशला लक्ष्मीबाईने मदत केल्याचा आरोप होता. हत्येनंतर रमेशने चाकूद्वारे विश्वनाथचे मुंडके वेगळे करून जाळले, तर उर्वरित शरीर झाकरवाडी शिवारातील प्रल्हाद काळबांडेच्या विहिरीत टाकले.
हत्येच्या दिवसापासून विश्वनाथ बेपत्ता झाल्यामुळे त्याचा मुलगा शंकरने ७ फेब्रुवारी २०१२ रोजी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविली होती. ११ फेब्रुवारी रोजी आत्माराम काळबांडेने प्रल्हाद काळबांडेच्या विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना दिली. याची माहिती शंकरला देण्यात आली. शंकरने घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटविली. पुरावे शोधण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते. श्वानामुळे मुंडके जाळलेल्या ठिकाणाचा शोध लागला. एका ठिकाणी काळे-पांढरे केस व राख, तर थोडे पुढे जबड्याचा भाग आढळून आला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Case of death in Washim High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.