सेना-भाजपा कार्टूनगिरीने रक्तबंबाळ

By Admin | Updated: February 14, 2017 21:39 IST2017-02-14T21:39:43+5:302017-02-14T21:39:43+5:30

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेतील भागीदार महापालिका निवडणुकांच्या प्रचारात तलवारी उपसून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत

Cartoon gargantuan bloodbath army-BJP | सेना-भाजपा कार्टूनगिरीने रक्तबंबाळ

सेना-भाजपा कार्टूनगिरीने रक्तबंबाळ

आॅनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेतील भागीदार महापालिका निवडणुकांच्या प्रचारात तलवारी उपसून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. खरे तर परस्परांच्या उरावर बसले आहेत. त्यासाठी विखारी शब्दांच्या बाणांबरोबरच कार्टूनच्या व्हिडीओंचा यथेच्छ वापर सुरू आहे. हे युद्ध अभूतपूर्व अशा व्यक्तिगत पातळीवर उतरल्याने दोन्ही पक्षांतील अनेक महारथी रक्तबंबाळ झाले आहेत.

जागावाटपाचे गणित जुळत नाही, हे लक्षात येताच सुईच्या अग्रावर राहील एव्हढीही जागा सोडणार नाही, असा टोकाचा पवित्रा घेत हे मित्र पक्ष एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे ठाकले. ही लढत मैत्रीपूर्ण असेल, ही अटकळ प्रचाराला सुरुवात होताच धूसर होत गेली. आता प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यावर दोन्ही बाजूंची भाषा हाडवैऱ्यांनाही लाजवेल इतकी तिखट आणि विखारी झाली आहे. विशेष म्हणजे या तडाख्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्यापासून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत कोणीही सुटलेले नाही. विरोधक म्हणजे काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही करणार नाहीत, अशी चिखलफेक सेना-भाजपाचे नेते एकमेकांवर करीत आहेत.

शिवसेनेकडून ‘सामना’ या पक्षाच्या मुखपत्रातून मोदी आणि फडणवीसांसह भाजपाच्या नेत्यांवर सडकून शरसंधान सुरू आहे. हा एव्हाना राष्ट्रीय पातळीवर कार्टूनचा विषय बनला आहे. सोबतचे सतीश आचार्य यांचे कार्टून हा त्याचाच बोलका पुरावा आहे. उद्धव यांनी नोटाबंदीपासून लावलेला मोदीविरोधी सूर आता टिपेला गेला आहे. त्यामुळे रामदास कदम, एकनाथ शिंदे हेही त्यांचीच री ओढत फडणवीसांवर बरसले आहेत. देवेंद्रभाई हे गुंडाचे कॅप्टन असल्याची टीका कदम यांच्यासारखे दुसऱ्या फळीतील नेते बिनधास्त करू लागले आहेत.

एरव्ही अनेक वर्षे महाराष्ट्रात शिवसेनेच्या धाकट्या भावाची भूमिका घेणारी भाजपा अमित शहांच्या नेतृत्वात बडे भैयाचा रूबाब दाखवू लागली आहे. शिवसेनेच्या अरे ला कारे म्हणताना लहान कार्यकर्ताही आता भीड बाळगेनासा झाला आहे. उद्धव, आदित्य आणि एकूणच शिवसेनेवर व्यंगातून प्रहार करणाऱ्या कार्टूनफिती भाजपाने खुले आम प्रसारित केल्या आहेत. सोबतच्या लिंकमधून त्या थेट पाहा. त्यातील विखार अनुभवण्याजोगा आहे. स्व. शिवसेनाप्रमुख हे ख्यातकीर्त व्यंगचित्रकार होते. त्यांनी वापरलेले हे मार्मिक शस्त्र भाजपा शिवसेनेविरुद्ध अधिक जहाल स्वरुपात वापरत आहे. वास्तविक रक्त न सांडता केलेली बोचरी टीका, दाखवून दिलेली विसंगती हा कार्टूनचा आत्मा. पण सध्याचे कार्टून वॉर टोकाला गेले आहे आणि रक्तबंबाळही करीत आहे. हे दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांच्या जवळ जातील की कायमची पाठ फिरवतील, हा त्यांच्यासाठी पॉइंट आॅफ नो रिटर्नला पोहोचले आहेत का, या प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. पण हा मतदारांना संभ्रमात टाकण्याचाच डाव असल्याचे मानणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

तरीही हे दोन्ही पक्ष आता एकमेकांचे तोंड पाहणार नाहीत, असे छातीठोकपणे सांगण्याचे धैर्य राजकीय निरीक्षक दाखवू शकलेले नाहीत. काँग्रेस तर याला सेना-भाजपातील लुटूपुटूची लढाईच म्हणत आहे. शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांचे भाकित केले असल्याने, सरकार स्थिर असल्याचा अन्वयार्थ राजकीय गोटांत काढला जात आहे.

निवडणुकांच्या काळात एकमेकांच्या उरावर बसणारे निकालानंतर गरजेपोटी एकमेकांच्या गळ्यात कसे प्रेमाने हात टाकतात, हे महाराष्ट्रातील मतदारांनी अनेकदा पाहिले आहे. १९९० च्या दशकात आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता अधोरेखित झाली. त्यातून सगळेच पक्ष कोणा ना कोणाच्या मैत्रीच्या वळचणीला गेलेच. त्यात राजकीय स्वार्थ आणि सोय हा केंद्रबिंदू राहिला. जसे शिवसेना-भाजपा एकत्र आले, तसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही अभिमान-स्वाभिमानाला मुरड घालत सत्तेसाठी जुळवून घ्यावे लागले. गेल्या दशकभरात या दोन्ही जोड्यांमध्ये एक समान धागा दिसत राहिला. प्रत्येकानी जोडीदारावर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना मित्राला नेस्तनाबूद करण्याच्याच खेळी झाल्या. त्याचाच भाग म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या चारित्र्याची लक्तरे वेशीवर टांगली. पण तरीही या टीकायुद्धाला व्यक्तिगत शत्रुत्वाचे वळण लागले नाही.

परंतु भाजपाचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या, भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह लहानसहान कार्यकर्तेही आजमितीस उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यास मागे-पुढे पाहात नाहीत. स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना ‘मातोश्री’ला लक्ष्य करण्याचा विचार भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेही केला नव्हता.

हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होत १९८० च्या दशकाच्या अखेरीस एक त्र आलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने ही युती जवळपास २५ वर्षे टिकवून ठेवली. अंतर्गत संघर्ष, रुसवे-फुगवे, जागावाटपावरून मतभेद, टोकाची नाराजी अशा अनेक अप्रिय हिंदोळ््यांवर झोके घेऊनही ही युती कायम राहिली. विधानसभेची गेली निवडणूक शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्रपणे म्हणजेच एकमेकांविरुद्ध लढली.

Web Title: Cartoon gargantuan bloodbath army-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.