आगारप्रमुखाच्या कक्षासमोर चालकाने ओतून घेतले रॉकेल
By Admin | Updated: September 8, 2016 19:50 IST2016-09-08T19:50:22+5:302016-09-08T19:50:22+5:30
आगार प्रमुखांकडून सतत त्रास होत असल्याचा दावा करीत एका चालकाने गुरूवारी सायंकाळी सहा वाजता आगारप्रमुखााच्या कक्षासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला.

आगारप्रमुखाच्या कक्षासमोर चालकाने ओतून घेतले रॉकेल
ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. 8 - एसटी़ महामंडळाच्या उदगीर येथील आगार प्रमुखांकडून सतत त्रास होत असल्याचा दावा करीत एका चालकाने गुरूवारी सायंकाळी सहा वाजता आगारप्रमुखााच्या कक्षासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेताच तेथील कर्मचाऱ्यांनी रोखल्याने अनुचित प्रकार टळला. घटनेनंतर चालकास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
उदगीर हे सीमावर्ती भागातील मोठे केंद्र असल्याने एस़ टी़ महामंडळास येथील आगारातून मोठे उत्पन्न मिळते. तुलनेने या ठिकाणी कामाचा ताणही मोठा आहे. गुरुवारी याच कामाच्या ताणातून व आगारप्रमुखांकडून होत असलेल्या त्रासास वैतागून चालक एच बी़ किने या चालकाने आगारप्रमुखाच्या कक्षासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेतले. यावेळी कक्षात उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील घटना टळली. या घटनेची माहिती कळताच आगारातील कर्मचारी़, चालक व वाहकांनी आगार प्रमुखांच्या कक्षाकडे धाव घेतली़ तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोलीसांना पाचारण केले होते़ पोलीस येताच आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या चालकास त्यांच्या स्वाधीन करण्यात आले़
चालक एच़ ब़ी़ किने हे यापूर्वी नंदूरबार जिल्ह्यातील अककलकुवा आगारात कार्यरत होते़ दोन महिन्यापूर्वीच त्यांची उदगीर आगारात बदली झाली होती़ याकाळात ड्युटीच्या कारणावरून आगारप्रमुख व त्यांच्यात वाद उद्भवला होता़ या पार्श्वभूमीवर किने यांनी गुरूवारी सायंकाळी टोकाचे पाऊल उचलले़
कारवाया वाढल्या
चालक व वाहकांच्या बाबतीत उदगीर आगाराने अतिकठोर निर्णय घेतल्याचा दावा घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांतून केला जात होता़ वाहक व चालकांना ड्युटीवर येण्यास पाच मिनीटेही उशीर झाला तर त्याची डिफाल्ट रजिस्टरला नोंद धेवून आगार प्रमुख कारवाया करीत होते़ तर जिल्ह्यातील इतर आगारांच्या तुलनेत येथील अशा कारवायांचे प्रमाण चार ते पाच पटीने अधिक असल्याचीही चर्चा होत होती़.
या घटनेसंदर्भात आगार प्रमुख एस़ आऱ बाशा म्हणाले, संबंधित चालक दोन महिन्यांपूर्वी बदलून आला आहे. त्याची प्रत्यक्ष भेट कालच झाली़. काल सायंकाळी त्याची हैदराबाद गाडीवर ड्युटी होती़ परंतु ऐनवेळी त्याने जाण्यास नकार दिल्याने गोंधळ उडाला़ त्यामुळे किने यास आपण खुलाशाबाबत बोललो होतो़ त्यानंतर त्याने आज हे असे कृत्य केले.