करिअर अँकेडमीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांचीही होणार चौकशी!

By Admin | Updated: March 6, 2017 02:19 IST2017-03-06T02:19:42+5:302017-03-06T02:19:42+5:30

सैन्य भरती पेपर फूट प्रकरण; आजी-माजी विद्यार्थ्यांंचे धाबे दणाणले

Career Academy students will be examined by the students! | करिअर अँकेडमीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांचीही होणार चौकशी!

करिअर अँकेडमीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांचीही होणार चौकशी!

सचिन राऊत
अकोला, दि. ५- सैन्य भरतीसाठी देशपातळीवर रविवार, २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या पूर्वीच फोडून ते विकणार्‍यांमध्ये अकोला जिल्हय़ातील कानशिवणी येथील करिअर अँकेडमीचे संचालक जाळय़ात अडकल्याने या अँकेडमीतील आजी-माजी विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहे. अँकेडमीत प्रशिक्षण घेतल्यानंतर नोकरीत कार्यरत असणार्‍यांवरही संशयाची सुई आल्याने त्यांची चौकशी होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
अकोला तालुक्यातील कानशिवणी येथे सेवानवृत्त कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मालकीची करिअर अँकेडमी आहे. या अँकेडमीमध्ये स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग घेण्यात येतात. अँकेडमीत प्रशिक्षण घेतलेले शेकडो उमेदवार सैन्य दलासह पोलीस दलात लागले आहेत. यामध्ये काही उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळाले असून, ते उमेदवार नोकरीत परिविक्षाधीन कालावधीत आहेत. या उमेदवारांना करिअर अँकेडमीत प्रवेश देताना नोकरी लावून देण्याची हमी घेण्यात येत होती. त्यामुळे अँकेडमीचे संचालक सुभाष निर्मळे यांचे वरिष्ठ स्तरावर साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना सैन्य भरतीचा लेखी पेपर फोडल्यानंतर नागपुरात अटक केल्याने यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
यामुळे ही अँकेडमी आता संशयाच्या फेर्‍यात सापडली आहे. या अँकेडमीत प्रशिक्षण घेतलेले शेकडो आजी-माजी विद्यार्थी आणि नोकरीत कार्यरतांची चौकशी होणार असल्याने त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

ठाणे पोलीस येणार अकोल्यात!
*सुभाष निर्मळे यांना नागपुरातून अटक केल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे गुन्हे शोध पथक निर्मळे यांना घेऊन लवकरच अकोल्यात येणार असल्याची माहिती आहे.
*निर्मळे यांच्या कानशिवणी येथील अँकेडमीची संपूर्ण झाडाझडती घेण्यात येणार असून, येथील विद्यार्थ्यांंचे दस्तावेजही ताब्यात घेण्यात येणार आहेत. या प्रकारामुळे येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात सापडले आहे.

प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी रडारवर!
सैन्य भरतीचे लेखी पेपर परीक्षेपूर्वीच फोडणार्‍यांमध्ये आणि सौदेबाजी करणारे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक निघाले आहेत. त्यामुळे प्रशिक्षण केंद्र आणि त्यामधील विद्यार्थी रडारवर आहेत. प्रशिक्षण केंद्रांची आणि यामधील विद्यार्थ्यांंचीही कसून चौकशी करण्यात येणार आहे.

नोकरी देण्याची हमी संशयास्पद
सेवानवृत्त कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेणार्‍या उमेदवाराला सैन्यात नोकरी देण्याची हमी देण्यात येत होती. हा प्रकार संशयास्पद असल्याने येथील विद्यार्थ्यांंची आता कसून चौकशी करण्यात येणार आहे.

Web Title: Career Academy students will be examined by the students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.