रत्नागिरीजवळ झायलो कारला अपघात, ७ ठार
By Admin | Updated: February 8, 2017 13:02 IST2017-02-08T09:38:19+5:302017-02-08T13:02:50+5:30
मुंबई - गोवा महामार्गावर खानू येथे भरधाव वेगाने जाणारी झायलो कार झाडावर आपटून झालेल्या अपघातात ७ जण ठार झाले.

रत्नागिरीजवळ झायलो कारला अपघात, ७ ठार
>ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. ८ - झायलो कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले, तर एक जखमी झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील खानू मठ येथे आज बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याचा सुमारास हा अपघात झाला. मृत्यूमुखी पडलेले सर्व तरुण पार्ले मुंबई येथील आहेत.
पार्ले येथे राहणारे प्रशांत गुरव यांची बहीण सावंतवाडी येथे राहत असून, तिच्याकडे जाण्यासाठी रात्री १ वाजण्याचा सुमारास प्रशांत आपल्या सात मित्रांसोबत निघाला. हे सर्वजण झायलो (एमएच-०६ / एएस-६२९१) कारमधून मुंबईहून निघाले. सकाळी ७.३० च्या सुमारास खानू मठ येथे त्यांची भरधाव वेगातील गाडी रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार आदळली.
या अपघातात मयूर वेळणेकर, प्रशांत गुरव, सचिन सावंत, अक्षय केरकर, निहाल कोटीयन, वैभव मनवे, केदार तोडणकर हे जागीच ठार झाले, तर अभिषेक कांबळी यामध्ये जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी प्रथम पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. अपघाताची खबर मिळताच खानू येथील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
गाडी पूर्णपणे चेपली गेली
गाडीचा टप पूर्णपणे चेपला गेला होता. त्यामुळे झाडावर आदळण्यापूर्वी गाडी पलटी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.