गुंडांचे कॅप्टन आणि टीम
By Admin | Updated: February 14, 2017 01:00 IST2017-02-14T01:00:49+5:302017-02-14T01:00:49+5:30
रामदासभाई (त्यांना प्रेमाने भाई म्हणतात. उगाच भाई या शब्दाचा गैरअर्थ कोणीही काढू नये. हल्ली शब्दही बदनाम होत चालले आहेत, म्हणून हा खुलासा) कदम

गुंडांचे कॅप्टन आणि टीम
रामदासभाई (त्यांना प्रेमाने भाई म्हणतात. उगाच भाई या शब्दाचा गैरअर्थ कोणीही काढू नये. हल्ली शब्दही बदनाम होत चालले आहेत, म्हणून हा खुलासा) कदम हे अतिशय म्हणजे अतिशयच स्पष्टवक्ते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून रामदासभाई खिशात राजीनामा ठेवून आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये राहणे अजिबातच मान्य नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी राजीनामा देता यावा, यासाठी त्यांनी ते पत्र तयार ठेवलेय.
फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे इतर मंत्री राजीनामा देतील की नाही, हे सांगता येत नाही, पण अत्यंत स्वाभिमानी, ताठ मानेने सर्वत्र फिरणारे रामदासभाई मात्र, नक्कीच राजीनामा देणार आहेत. त्यांच्यासारखे स्वाभिमानी, अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेले, भ्रष्टाचाराच्या विरोधात गेली अनेक वर्षं लढणारे, गुंडांचा सतत सामना करणारे नेते आणि कर्दनकाळ यापुढे फडणवीसांच्या सरकारमध्ये राहूच शकत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुंडांचे कॅप्टन आहेत, असे रामदासभार्इंनी जाहीर केल्यानंतर, ते स्वत: गुंडांच्या कॅप्टनसोबत काम करूच शकणार नाहीत. नाही दिला राजीनामा तर त्यांची प्रतिमा बिघडेल की!
नाईलाज म्हणूनच गुंडांचे कॅप्टन असलेल्या फडणवीसांच्या टीममध्ये तब्बल अडीच वर्षं रामदासभाई काम करताहेत. आता मात्र, काम करणे त्यांना शक्यच नाही. खरं तर रामदासभार्इंनी फडणवीसांना गुंडांचे कॅप्टन म्हणताच, शिवसेनेच्या सर्वच स्वाभिमानी, स्वच्छ चारित्र्याच्या आणि गुंडांचे कर्दनकाळ असणाऱ्या मंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामे देणे अपेक्षित होते. गुंडांच्या कॅप्टनच्या टीममध्ये काम करणे म्हणजे, स्वत:वर कलंक लावून घेणेच या शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी... पण काय करणार? पक्षप्रमुख त्यांना राजीनामा द्यायला सांगतच नाहीत. त्यामुळे सेनेच्या इतर मंत्र्यांना उद्धव ठाकरे यांचा आदेश मानावा की, रामदासभार्इंच्या या खणखणीत आणि सडेतोड आरोपानंतर राजीनामा द्यावा, हे कळेनासे झाले आहे.
रामदासभाई म्हणजे, समर्थ रामदासांनी लिहिल्याप्रमाणे वागणारे नेते आहेत.
मना सज्जना भक्तिपंथेची जावे...पासून ते थेट
जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे...
सदाचार हा थोर सांडू नये तो...
मना वासना दुष्ट कामा नये रे...
मना सर्वथा पापबुद्धी नको रे...
मना सर्वना नीति सोडूं नको रे...
हे सारे मनाचे श्लोक त्यांना नुसतेच पाठ नसून, ते गेली कित्येक वर्षं सार्वजनिक आयुष्यात त्याचे आचरणही करताहेत. कोणाला खोटं वाटत असेल तर मालाड, कांदिवली यापासून कोकणापर्यंत कुठेही त्यांच्या कार्याची महती जाणून घ्यावी.
फडणवीस महोदय, तुम्ही गुंडांचे कॅप्टन आहात, असे रामदासभार्इंनी ठरवून टाकलेय. आता तरी तुम्ही सुधरा. अन्यथा दुर्जनांचे कर्दनकाळ असलेले रामदासभाई तुमच्यातील गुंडांचा पाडावच करतील.
रामदासभाई, तुम्हीही खिशातला राजीनामा पाठवून द्या एकदाचा. अन्यथा गुंडांच्या कॅप्टन असलेल्या फडणवीसांच्या टीममध्ये तुम्हीही असल्याने तुमच्यासकट सर्व शिवसेनेचे मंत्रीही गुंड आहेत, असा अर्थ काढला जाईल. ते होण्याआधी, अगदी आजच्या आज सोक्षमोक्ष लावूनच टाका.
बा. सी. मर्ढेकर यांनी कवितेत
जे जे म्हणविती पुढारी
वेळ येता देती तुरी,
सुरा पाठीत छर्रा उरी
तुम्हां आम्हां
असे लिहिलेय, तसे प्रत्यक्षात घडू नये, यासाठी रामदासभार्इंचा खटाटोप सुरू आहे, हे लक्षात घ्यायला हवे!
-संजीव साबडे