कोल्हापूरची प्रीती राज्य हॉकी संघाची कप्तान
By Admin | Updated: November 25, 2014 00:08 IST2014-11-25T00:03:18+5:302014-11-25T00:08:16+5:30
मुगळी (ता. गडहिंग्लज) गावाचे नाव झारखंड राज्यापर्यंत पोहोचले.

कोल्हापूरची प्रीती राज्य हॉकी संघाची कप्तान
नूल : केवळ दहा गुंठे जमिनीत रक्ताचे पाणी करून राबणारे आई-वडील. परिस्थितीवर मात करून जिद्दीच्या जोरावर शिकणाऱ्या तीन मुली. यातील एका मुलीने हॉकी खेळाच्या जोरावर आटकेपार झेंडा फडकविला. महाराष्ट्राच्या शालेय हॉकी संघाची कर्णधार बनली आणि मुगळी (ता. गडहिंग्लज) गावाचे नाव झारखंड राज्यापर्यंत पोहोचले. प्रीती आण्णासाहेब माने हे या जिद्दी खेळाडूचे नाव आहे.मुगळी या छोट्याशा खेडेगावात आण्णासाहेब भीमा माने हे शेतमजुरी करतात, तर आई भारती गृहिणी आहेत. अश्विनी, प्रीती, स्वप्नाली या तीन मुली. प्रीती ही नूल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत आहे. शाळेतील हॉकीचा इतर मुलींचा खेळ पाहून तिने हॉकीची स्टिक हातात धरली. चार किलोमीटरची पायपीट करून ती खेळाचा सराव करते. सेंटर फॉरवर्डला संघात खेळताना ती प्रतिस्पर्धी संघाच्या छातीत धडकी भरविते. तिच्याकडे चेंडू गेला की गोल नक्की ठरलेला. इतके नैप्युण्य तिने प्राप्त केले आहे. नैप्युण्य आणि जिद्दीच्या जोरावर परिस्थितीवर मात करीत तिची गतवर्षी शालेय गटातून महाराष्ट्र संघात निवड झाली.
यावर्षी ती शालेय गटातून महाराष्ट्र संघाची कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. रांची (झारखंड) येथे या स्पर्धा सुरू आहेत. या निमित्ताने मुगळीचे नाव क्रीडा इतिहासाच्या नकाशावर आले आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने शाळेतील शिक्षक एस. जे. माने यांनी वेळावेळी तिला आर्थिक मदत केली आहे.
आई-वडिलांच्या राबणुकीतून मिळणाऱ्या दुधाचे बिलदेखील मुलींच्या शिक्षणावर खर्च होत. अशा अवस्थेत प्रीतीची महाराष्ट्र हॉकी संघाच्या कर्णधारपदी झालेली निवड मुगळीकरांना भूषणावह ठरली आहे. तिला क्रीडाशिक्षक आर. ए. चौगुले, मनोहर मांगले, उदय पोवार यांचे मार्गदर्शन, तर प्राचार्य डी. एस. चव्हाण, पर्यवेक्षक टी. एम. राजाराम, जिमखाना प्रमुख एस. जे. माने यांचे प्रोत्साहन लाभले. (वार्ताहर)