नरभक्षक वाघाला गोळ्या घालून मारले
By Admin | Updated: December 29, 2014 00:29 IST2014-12-29T00:28:37+5:302014-12-29T00:29:26+5:30
कोंगळा जंगलात कारवाई : वन खात्याची मोहीम फत्ते

नरभक्षक वाघाला गोळ्या घालून मारले
बेळगाव : एक महिन्याहून अधिक काळ धुमाकूळ घालून महिलेचा बळी घेतलेल्या नरभक्षक वाघाला आज, रविवारी रात्री आठच्या सुमारास वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी गोळ्या घालून ठार मारले.
नेरसाजवळील कोंगळा जंगलात या वाघाला ठार केल्याची माहिती डी.एफ.ओ. अंबाडी माधव यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून वन खात्यासह इतर खात्यांचे ३०० हून अधिक कर्मचारी वाघाचा शोध घेण्याच्या मोहिमेत गुंतले होते. काल, शनिवारी चामराजनगर येथून आलेले स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सचे जवानही वाघ शोधण्याच्या मोहिमेत सहभागी झाले होते. दांडेली येथून प्रशिक्षित हत्तीही वाघ शोधण्यासाठी मागविण्यात आला होता .
मुडगई येथील अंजना हणबर या महिलेवर वाघाने ठार केल्यानंतर जनक्षोभ निर्माण झाला होता. यामुळे खानापूरचे आमदार अरविंद पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी वन खाते आणि पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर वाघ पकडण्याच्या मोहिमेला गती प्राप्त झाली.
प्रधान मुख्य वनसंरक्षक विनय लुथ्रा यांनी वाघाला गोळ्या घालून ठार मारण्याचा आदेश दिल्यावर इतर ठिकाणांहून फौजफाटा मागवून वाघ पकडण्याच्या मोहिमेला जोमाने प्रारंभ करण्यात आला. गेले दोन दिवस वाघ आणि वन खात्याचे कर्मचारी यांच्यात पाठशिवणीचा खेळ सुरू होता. वाघ आलाय, अशी माहिती मिळताच वन खात्याचे कर्मचारी संबंधितस्थळी जात होते. मात्र, तोपर्यंत वाघाने तेथून मुक्काम हलवलेला असायचा. अखेर आज वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी नरभक्षक वाघाला गोळ्या घालून ठार केले.