उमेदवारांची मालमत्ता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर
By Admin | Updated: September 25, 2014 23:27 IST2014-09-25T22:17:35+5:302014-09-25T23:27:12+5:30
मतदारांना हे शपथपत्र पाहता येणार

उमेदवारांची मालमत्ता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर
कणकवली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे स्थावर आणि जंगम मालमत्ता नमूद असलेले शपथपत्र निवडणूक आयोगाकडून तत्काळ प्रसिद्ध केले जाणार आहे. हे शपथपत्र आयोगाच्या संकेतस्थळावर पहाता येणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ठिकाणीही नोटीसबोर्डवर शपथपत्राची प्रसिद्धी केली जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर आचारसंहिताही जाहीर झाली आहे. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज घेताना संबंधिताचे नाव, संपर्क क्रमांक तसेच उमेदवाराचे नाव अशी माहिती नोंद करून घेतली जात आहे. उमेदवारी अर्ज मराठी किंवा इंग्रजीपैकी एका भाषेत भरायचा आहे. शपथपत्र, बँक खाते क्रमांकाची माहिती, उमेदवाराने नेमलेल्या प्रतिनिधीची माहिती, अर्ज मागे घेण्याबाबतचा अर्ज, निवडणूक प्रतिनिधी नेमणे, नेमलेल्या प्रतिनिधीची निवड रद्द करणे, मतदान प्रतिनिधी नेमणे, प्रसिद्धीपत्रके प्रकाशित करण्यापूर्वी निवडणूक आयोगाची बंधने याबाबतची माहिती भरावी लागणार आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाचा तपशील दररोज द्यावा लागणार आहे. सभा किंवा प्रचारफेरी यांचे नियोजनही निवडणूक अधिकाऱ्यांना कळवावे लागणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवाराला स्वत:च्या मालमत्तेबाबत स्वत:ची संपूर्ण माहिती नामनिर्देशन अर्जासोबत सादर करावी लागणार आहे. हे शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सादर करावे लागणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हे शपथपत्र प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे मतदारांना हे शपथपत्र पाहता येणार आहे. (वार्ताहर)