टोल रद्दसाठीचा ‘कोल्हापूर बंद’ मागे नाही
By Admin | Updated: August 23, 2014 00:35 IST2014-08-23T00:35:37+5:302014-08-23T00:35:37+5:30
‘कोल्हापूर बंद’चा निर्णय कोणत्याही स्थितीत मागे घेतला जाणार नाही, असा आक्रमक पवित्र समितीने शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासमोर घेतला.

टोल रद्दसाठीचा ‘कोल्हापूर बंद’ मागे नाही
कोल्हापूर : कोल्हापुरातील टोल रद्द करावा, मगच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे यावे. टोल रद्द मागणीसाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने पुकारलेला ‘कोल्हापूर बंद’चा निर्णय कोणत्याही स्थितीत मागे घेतला जाणार नाही, असा आक्रमक पवित्र समितीने शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासमोर घेतला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंगळवारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना भूमिपूजन समारंभास येत आहेत. याच दिवशी टोलविरोधी कृती समितीने ‘कोल्हापूर बंद’चा निर्णय घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर कसबा बावडा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात डॉ. शर्मा यांनी दुपारी बैठक बोलविली होती. यावेळी डॉ. शर्मा यांनी टोल समितीची मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी बंद दिवशी अर्धा तास बैठक अथवा चर्चा घडवून आणू, अशी विनंती समितीला केली, पण ही विनंती धुडकावत हा बंद मागे घेणार नाही. कारण चारवेळा मुख्यमंत्र्यांशी या प्रश्नावर चर्चा होऊनही त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नियोजित ‘कोल्हापूर बंद’ हा होणारच, असा आक्रमक पवित्र घेतला.
हा बंद शांततेत पाळू, अशी ग्वाही समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी यावेळी डॉ. शर्मा यांना दिले. बैठकीस बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण, दिलीप पवार यांच्यासह कृती समितीतील कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अत्यावश्यक सेवा वगळल्या
च्या बंदमधून दवाखाने,औषध
दुकाने, दूध विक्री केंद्रे,अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका सेवा यांना वगळण्यात आले असल्याचे समितीने कळविले आहे.