पत्नीला जाळणाऱ्या डॉक्टरला ठोठावलेली जन्मठेप रद्द
By Admin | Updated: October 1, 2015 03:16 IST2015-10-01T03:16:21+5:302015-10-01T03:16:21+5:30
शिवकृपा बंगला, ओंकार नगर, पेठ रोड, नाशिक येथील राहत्या घरात सात महिन्यांच्या गरोदर पत्नीला रॉकेल ओतून जिवंत जाळल्याबद्दल सत्र न्यायालयाने नाशिक येथील डॉक्टर

पत्नीला जाळणाऱ्या डॉक्टरला ठोठावलेली जन्मठेप रद्द
मुंबई : शिवकृपा बंगला, ओंकार नगर, पेठ रोड, नाशिक येथील राहत्या घरात सात महिन्यांच्या गरोदर पत्नीला रॉकेल ओतून जिवंत जाळल्याबद्दल सत्र न्यायालयाने नाशिक येथील डॉक्टर डॉ. अजित विश्वनाथ बोराडे यांना ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करून उच्च न्यायालयाने अपिलात त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
स्वत: डॉ. बोराडे हेही या घटनेत १७ टक्के भाजले होते. शिवाय घराचा दिवाणखाना, जिना व बेडरूममधील विजेच्या सर्व तारा जळून वितळून गेल्या होत्या व घरातील सर्व सामानही आग आणि धुराने काळेठिक्कर पडले होते. यावरून पत्नी उषा ऊर्फ वृषाली हिचा मृत्यू पतीने रॉकेल ओतून पेटविल्याने नव्हे, तर शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण घराला आग लागून झाला असावा, हे अधिक विश्वसनीय वाटते, असे नमूद करीत उच्च न्यायालयाने डॉ. बोराडे यांना निर्दोष ठरविले.
डॉ. बोराडे यांचा पेठ रोडवर फुले नगरात अंजली क्लिनिक नावाचा दवाखाना आहे. पत्नी उषा ऊर्फ वृषाली १ जून २००७ रोजी १०० टक्के भाजली होती व नंतर तिचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. सत्र न्यायालयात डॉ. बोराडे यांच्याखेरीज त्यांची कथित प्रेयसी संगिता पी. सूर्यवंशी हिच्यावरही खटला चालला होता. सत्र न्यायालयाने संगिताला निर्दोष मुक्त केले.
मात्र डॉ. बोराडे यांना खुनाबद्दल दोषी ठरवून जन्मठेप ठोठावली होती. त्याविरुद्ध डॉ. बोराडे यांनी केलेले अपील मंजूर करून कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरामाणी आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे निकाल दिला. मयत उषा ऊर्फ वृषाली हिचे माहेर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील अहिरे कुटुंबातील. ती पूर्वी नाशिकच्या नामको कर्करोग रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीस होती. डॉ. बोराडे हेही तेथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करायचे. तेथे दोघांचे प्रेम जुळले. बोराडे यांची जात वेगळी म्हणून उषाच्या माहेरच्या लोकांनी लग्नाला विरोध केला. तरी डॉ. बोराडे व उषा यांनी २४ मे २००५ रोजी लग्न केले. त्यांचा पहिला मुलगा दगावला. भाजून मृत्यू झाला तेव्हा
उषा दुसऱ्यांदा गर्भवती होती.
(विशेष प्रतिनिधी)
---------
प्रेमाचे त्रिकोणी कथानक
अभियोग पक्षाच्या कथानकानुसार उषा हिच्याशी लग्न केल्यावरही डॉ. बोराडे यांचे नामको हॉस्पिटलमधील आणखी एक नर्स संगिता सूर्यवंशी हिच्याशी प्रेमसंबंध होते. आपल्याला तिच्याशी लग्न करायचे आहे, त्यामुळे उषाने सोडचिठ्ठी द्यावी, यासाठी ते एकसारखा तगादा लावायचे. त्यातूनच त्यांनी उषाला रॉकेल ओतून जाळले. परंतु उच्च न्यायालयाने खुनाचा हा हेतू विश्वासार्ह मानला नाही. उलट उषाच्या नातेवाइकांच्या साक्षींवरून डॉ. बोराडे व उषा यांचा संसार सुखाने चालला होता, असे दिसत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.