पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींचा शो रद्द करा - शिवसेना
By Admin | Updated: October 7, 2015 15:54 IST2015-10-07T15:12:17+5:302015-10-07T15:54:16+5:30
शिवसेनेने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवत प्रसिद्ध पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींचा शो रद्द करा - शिवसेना
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - शिवसेनेने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवला असून पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द करा अशी मागणी आयोजकांकडे केली आहे. शो रद्द न केल्यास शिवसेना स्टाईल विरोध करु असा धमकीवजा इशाराच शिवसेनेने दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांवर आक्षेप आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतात कार्यक्रम करु देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने नेहमीच मांडली आहे. आता गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा पाकविरोधी सूर आळवला आहे. गझल गायक गुलाम अली यांचा ९ ऑक्टोबररोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शो होणार आहे. बुधवारी शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे सचिव अक्षय बद्रापूरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी षण्मुखानंद सभागृहात जाऊन कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. भारतीय जवानांना मारणा-या पाकसोबतच्या सांस्कृतिक संबंधांना आमचा विरोध असल्याचे अक्षर बद्रापूरकर यांनी सांगितले. हा शो रद्द करावा अशी मागणी करणारे पत्र बद्रापूरकर यांनी आयोजक व षण्मुखानंद प्रशासनाला दिले आहे.