कॅम्पा कोलाची अनधिकृत घरे अखेर नियमित
By Admin | Updated: January 31, 2015 05:44 IST2015-01-31T05:44:52+5:302015-01-31T05:44:52+5:30
वरळीच्या कॅम्पा कोला कम्पाउंडमध्ये असलेल्या सात इमारतींचे ३५ अनधिकृत मजले म्हणजे त्यावरील एकंदर १४५ सदनिका नियमित करण्याचा आदेश देऊन सर्वोच्च

कॅम्पा कोलाची अनधिकृत घरे अखेर नियमित
मुंबई : वरळीच्या कॅम्पा कोला कम्पाउंडमध्ये असलेल्या सात इमारतींचे ३५ अनधिकृत मजले म्हणजे त्यावरील एकंदर १४५ सदनिका नियमित करण्याचा आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने या रहिवाशांना शुक्रवारी मोठा दिलासा दिला. या निकालाचे वृत्त समजल्यानंतर यासाठी प्राणपणाने झुंजलेल्या कॅम्पा कोलातील रहिवाशांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.
कॅम्पो कोलातील अनधिकृत सदनिका कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले. राज्यातील नवे सरकार अनुकूल असल्यास कॅम्पा कोलामधील अनधिकृत सदनिका नियमित करण्याबाबत विचार होऊ शकतो. नव्या सरकारची मंजुरी असल्यास या निर्णयाचा फेरविचार होऊ शकतो, असे न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते. आता चौकटीत राहूनच नियमित करण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहेत. कॅम्पा कोला कम्पाउंडमधील मिडटाऊन, आॅर्किड, शुभम् अपार्टमेंट, ईशा-एकता, पटेल, बी.वाय. अपार्टमेंट या सात इमारतींचे एकूण ३५ मजले अनधिकृत आहेत. महापालिकेने या सदनिका पाडण्याची कारवाई सुरू केल्यानंतर हे प्रकरण आधी उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात आले होते. (प्रतिनिधी)