कॉल सेंटर घोटाळा अमेरिकन निवडणुकीत
By Admin | Updated: October 20, 2016 05:39 IST2016-10-20T05:39:56+5:302016-10-20T05:39:56+5:30
२५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा मुद्दा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलला

कॉल सेंटर घोटाळा अमेरिकन निवडणुकीत
जितेंद्र कालेकर,
ठाणे- मीरा रोड येथील बोगस कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची २५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा मुद्दा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलला आहे. भारतामधील कॉल सेंटरमुळे अमेरिकेतील युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत असल्याचा आरोप करणाऱ्या ट्रम्प यांनी भारतातील अशा कॉल सेंटरमधून अमेरिकी नागरिकांची फसवणूकही होत असल्याचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आता कॉल सेंटर प्रकरणातील माहिती लीक होऊ नये, याकरिता ठाणे शहर पोलिसांच्या युनिट-१मध्ये पत्रकार, मीडियाची नाकाबंदी करण्यात आली आहे.
मीरा रोड येथील बोगस कॉल सेंटरमधून होत असलेल्या फसवणुकीबाबत अलीकडेच ७४ जणांना अटक करण्यात आली. अमेरिकेतील निवडणुकीत हा मुद्दा गाजू लागल्याने आयबी व अन्य केंद्रीय एजन्सी आणि विदेश मंत्रालयाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. या निवडणुकीतील एक प्रभावी व बोलघेवडे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील कॉल सेंटरचा मुद्दा विशेष चर्चेला घेतला आहे. प्रचाराच्या पहिल्या फेरीतच म्हणजे एप्रिल २०१६ मध्ये अमेरिकन युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करून त्यांनी या परिस्थितीसाठी अमेरिकेतील विद्यमान नेतृत्वाला जबाबदार धरले होते. भारतीय हे अमेरिकनांच्या रोजगारावर डल्ला मारतात, असा प्रचार ट्रम्प सातत्याने करीत आहेत. आता राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना ठाण्यातील बोगस कॉल सेंटरचे प्रकरण उघडकीला आले. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची सुमारे २५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड होताच ट्रम्प यांनी त्यांची भाषणे, मुलाखती यामध्ये या प्रकरणाचा दाखला देत विद्यमान सरकारवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अमेरिकेतील एफबीआयचे अधिकारी अलीकडेच ठाण्यात येऊन गेले व त्यांनी या प्रकरणातील माहितीची देवणघेवाण केली. या प्रकरणाच्या तपासाकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखवली. आयबीनेही अलीकडेच या प्रकरणात लक्ष घातले. विदेश मंत्रालयातील अधिकारीही या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
>युनिट-१ची ‘नाकाबंदी’
मीरा रोड कॉल सेंटर प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू असून त्यामध्ये बाधा येणारे कोणतेही वृत्त किंवा माहिती ‘लीक’ होऊ नये, यासाठी मीडियासह खासगी व्यक्तींना गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१मध्ये आता प्रवेशबंदी केली आहे.विचारपूस केल्यानंतरच संबंधितांना या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोणतीही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीविना कोणाहीशी ‘शेअर’ करू नये, असेही आदेश या युनिटच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.