प्राणिमित्राची हाक : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बिबट्या’
By Admin | Updated: January 3, 2015 01:04 IST2015-01-03T01:04:30+5:302015-01-03T01:04:56+5:30
विजय जाधव या प्राणिमित्राने बिबट्याची वेशभूषा करून ‘आम्हाला जगू द्या’ची मागणी--अनोखे आंदोलन

प्राणिमित्राची हाक : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बिबट्या’
कोल्हापूर : रुईकर कॉलनीत बिबट्या आल्याची घटना ताजी असतानाच आज, शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातही एक बिबट्या शिरला; परंतु हा बिबट्या ‘ओरिजिनल’ नव्हता, तर बिबट्याची वेशभूषा केलेला प्राणिमित्र होता. बिबट्याची वेशभूषा साकारलेला इस्लामपूर तालुक्यातील साखराळेचा प्राणिमित्र विजय जाधव याने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व वनविभागाच्या कार्यालयात जाऊन ‘आम्हाला जगू द्या’ अशी विनवणी केली. वन्य जिवांच्या संरक्षणासाठी केलेल्या या अभिनव आंदोलनामुळे नागरिकांत तो चर्चेचा विषय ठरला.
रुईकर कॉलनीत काल, गुरुवारी आढळलेला बिबट्या वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे मृत झाल्याचा आरोप जाधव यांनी केला. नागरी वस्तीत बिबट्या आला, तर त्याला पकडण्यासाठी आवश्यक यंत्रणा कोल्हापुरात नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्याचा निषेध व वन्य जिवांची हत्या थांबवावी, असा संदेश देण्यासाठी चक्क बिबट्याची वेशभूषा करून जाधव येथे आले.
दुपारी दीड वाजता उड्या मारीतच हा ‘बिबट्या’ जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला. कार्यालयात सर्वत्र फिरल्यानंतर तो पुन्हा बाहेर आला आणि मुख्य रस्त्यावरही गेला. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या आडवे जात त्याने ‘आम्हाला जगू द्या,आमचं घर कुठाय?’ अशी विचारणा करण्यास सुरुवात केली. नंतर तो पोलीस अधीक्षक, वनविभाग कार्यालयात गेला. तेथेही त्याने वन्यजीव संरक्षणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या अभिनव आंदोलनाबद्दल बोलताना विजय जाधव म्हणाले की, माझे आंदोलन ही मूक जनावरांची विनंती आहे. प्राण्यांचेही एक विश्व असते. त्यांचे कुटुंब असते. त्यांच्या व्यथा असतात. जंगली जनावर जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडते त्यावेळी त्याचीही कोणीतरी वाट पाहत असते. अशा जनावरांचे आपण संरक्षण केले पाहिजे, परंतु दुर्दैवाने जंगलात गावे वसत आहेत; त्यामुळे जनावरे मानवी वस्तीकडे येऊ लागली आहेत.
रुईकर कॉलनीत सापडलेल्या बिबट्याला वन विभागाने व्यवस्थित हाताळले नाही. त्यांच्या निष्काळजीपणाचा तो बळी ठरला, म्हणूच या प्रकरणाची चौकशी करून संबंधित वनाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही जाधव यांनी केली. (प्रतिनिधी)
प्राणिमित्राची हाक : कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत सापडलेला बिबट्या वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे मृत झाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी विजय जाधव या प्राणिमित्राने बिबट्याची वेशभूषा करून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. / वृत्त हॅलो ३