केबल टीव्ही झाले बंद !
By Admin | Updated: January 2, 2016 08:37 IST2016-01-02T08:37:12+5:302016-01-02T08:37:12+5:30
सेट टॉप बॉक्स नसणाऱ्या ९ लाख टीव्हींवर आजपासून मुंग्या दिसू लागतील. राज्यातील केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनच्या तिसऱ्या टप्प्याची कारवाई पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची

केबल टीव्ही झाले बंद !
मुंबई : सेट टॉप बॉक्स नसणाऱ्या ९ लाख टीव्हींवर आजपासून मुंग्या दिसू लागतील. राज्यातील केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनच्या तिसऱ्या टप्प्याची कारवाई पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ केंद्र शासनाने नाकारल्यामुळे हा निर्णय महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. राज्यात शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या केबल सेनेचे वर्चस्व असणाऱ्या केबल व्यवसायावर या निर्णयाने टाच येणार असून, एक प्रकारे भाजपाने नववर्षात केबल सेनेलाही मुंग्या आणण्याचे काम केले आहे.
खडसे म्हणाले, केबल टीव्हीच्या ‘डिजिटायझेशन फेज थ्री’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची कार्यवाही ३० सप्टेंबर २०१४पर्यंत पूर्ण करायची होती. मात्र त्या वेळेत हे काम पूर्ण झाले नाही म्हणून केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने ही मुदत ३१ डिसेंबर २०१५पर्यंत वाढवली होती.
महसुली उत्पन्न वाढेल
या मोहिमेचा आढावा घेतला असता बऱ्याच केबल टीव्हीधारकांनी सेट टॉप बॉक्स बसवले नसल्याचे उघडकीस आले. अशांची संख्या जवळपास ९ लाखांच्या घरात आहे.
राज्याच्या महसुली उत्पन्नापैकी करमणूक शुल्क हे महत्त्वाचे उत्पन्न असल्याने केबल फेज थ्रीची अंमलबजावणी पूर्ण न होण्याचा विपरीत परिणाम राज्याच्या महसुलावरही होत असल्याचे खडसे म्हणाले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर करमणूक कर बुडविल्याची उदाहरणेही समोर आली.
ही सगळी माहिती दिल्लीत झालेल्या बैठकीत ठेवण्यात आली. अन्य राज्यांनीही फेज थ्रीच्या कामाला ३१ मार्च २०१६पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती; मात्र केंद्राने ती मागणी अमान्य केली.
परिणामी राज्यातच नाही, तर देशभरात सगळीकडेच आता ज्यांनी सेट टॉप बॉक्स बसवलेले नाहीत त्यांचे सिग्नल आजपासून बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले.
राज्यात करमणूक करापोटी ७५० कोटींचे उत्पन्न मिळते. सेट टॉप बॉक्स लावल्यास हे उत्पन्न आणखी वाढेल.
- मनुकुमार श्रीवास्तवही, प्रधान सचिव, महसूल विभाग