मंत्रिमंडळाचा विस्तार जूनमध्ये!

By Admin | Updated: May 22, 2016 03:34 IST2016-05-22T03:34:38+5:302016-05-22T03:34:38+5:30

राज्य मंत्रिमंडळाचा दीर्घ काळापासून रखडलेला विस्तार विधान परिषदेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर लगेच होण्याची दाट शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली.

Cabinet expansion in June! | मंत्रिमंडळाचा विस्तार जूनमध्ये!

मंत्रिमंडळाचा विस्तार जूनमध्ये!

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा दीर्घ काळापासून रखडलेला विस्तार विधान परिषदेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर लगेच होण्याची दाट शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडच्या दिल्ली भेटीत विस्ताराविषयी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना विस्ताराची परवानगी दिली आहे. मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार नाहीत; पण काही मंत्र्यांकडील खाती काढून ती नवीन मंत्र्यांना दिली जाऊ शकतात. त्यात प्रामुख्याने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडील काही खाती काढली जातील. त्यांच्याकडे महसूलसह उत्पादन शुल्क, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास, वक्फ, मदत व पुनर्वसन आदी खाती आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडील ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना, महिला व बालकल्याणपैकी किमान एक मोठे खाते जाईल. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडील खात्यांचे विभाजन होऊ शकते. प्रकाश मेहता यांच्याकडील कामगार खाते नवीन मंत्र्यांना दिले जाऊ शकते. राज्यमंत्र्यांपैकी डॉ. रणजीत पाटील, राम शिंदे, प्रवीण पोटे-पाटील, विद्या ठाकूर, विजय देशमुख यांना काही खाती गमवावी लागू शकतात. कामगिरीच्या आधारावर काही मंत्र्यांना वगळले जाणार, अशी चर्चा असली तरी तसे होण्याची शक्यता नाही. त्यामुळे विस्तार होईल; पण फेरबदल केवळ खात्यांचा होईल.
शिवसेनेनेही आपल्या कोट्यातील रिक्त मंत्री पदे भरण्यासाठी नावे द्यावीत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला पाच जागा जिंकण्याचा विश्वास आहे. त्यातील दोन किंवा तीन जागा मित्र पक्षांना दिल्या जातील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि रिपब्लिकन पक्षाकडून एकाला संधी मिळू शकते. भाजपामधून दोघांना विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळेल.
आधी महामंडळांवरील नियुक्त्या आणि नंतर विस्तार होईल, असे आतापर्यंत म्हटले जात होते. मात्र, आता आधी विस्ताराचा मुहूर्त लागेल आणि नंतर महामंडळांवरील नियुक्त्या करण्यात येणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Cabinet expansion in June!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.