ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला मंत्रिमंडळाची मंजुरी
By Admin | Updated: June 13, 2014 14:41 IST2014-06-13T12:09:06+5:302014-06-13T14:41:11+5:30
दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असणा-या ठाणे जिल्हा विभाजनाच्या प्रस्तावाला अखेर मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे.

ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला मंत्रिमंडळाची मंजुरी
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १३ - दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असणा-या ठाणे जिल्हा विभाजनाच्या प्रस्तावाला अखेर मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवल्याने आता ठाणे व पालघर असे दोन जिल्हे अस्तित्वात येतील. शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याबाबत लौकरच अधिकृत घोषणा करणार आहेत.
नव्या जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हे राहणार असून विभाजनाचे विधेयक आता विधिमंडळात मांडले जाईल. सुमारे दोन महिन्यात नवा जिल्हा अस्तित्त्वात येईल, असे समजते. प्रस्तावित नवीन जिल्ह्यात पालघर, वसई, डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा, मोखाडा आणि विक्रमगड या आठ तालुक्यांचा समावेश असेल. तर मूळ ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर हे सात तालुके असतील. .
सध्या अस्तित्वात असलेल्या ठाणे जिल्ह्याचे प्रचंड क्षेत्रफळ तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये निर्माण होणा-या अडचणी, नागरी सुविधांचा अभाव, कुपोषित बालकांचा प्रश्न इ. बाबी लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी जिल्हा विभाजनाची मागणी केली होती. विविध प्रश्नांनी येथील आदिवासी भाग होरपळत असून येथलाच जिल्हा व्हावा अशी मागणी सर्वसामान्यांतून पुढे येत होती, परंतु नानाविध कारणावरून हे विभाजन सतत रखडत होते.